Junnar Double Murder : जुन्नर हादरले! लग्न लावून देत नसल्याच्या रागातून बापाची आणि भावाची निर्घृण हत्या
Junnar Double Murder : जुन्नर तालुक्यातील मढ पारगाव येथील धक्कादायक घटना; लाकडी चोपणी आणि दगडाने डोक्यावर वार करून दोघांना संपवले, आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

Junnar Double Murder – जुन्नर तालुक्यातील मढ पारगाव येथे धक्कादायक दुहेरी हत्याकांड उघडकीस आले असून, मुलानेच आपल्या वडिलांचा आणि भावाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ओतूर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. मढ पारगाव (ता. जुन्नर) येथील लक्ष्मण गोविंद कदम यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये जयराम महादू मुकणे हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते.
आरोपी बाबाजी जयराम मुकणे (वय 32) याने 2 जूनच्या रात्री ते 3 जूनच्या सकाळी दरम्यान आपल्या वडिलांचा आणि भावाचा खून केल्याचा आरोप आहे. मृतांमध्ये जयराम महादू मुकणे (वय 65) आणि राजू जयराम मुकणे (वय 30) यांचा समावेश आहे. आरोपीने लाकडी चोपणी तसेच दगडाने डोक्यावर वार करून दोघांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
लग्न लावून देत नसल्याच्या कारणावरून आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी बाबाजी मुकणे याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे मढ पारगाव परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





