Junnar Accident : भीषण अपघात! पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; चालक फरार
Junnar Accident : करंजाळे परिसरातील 'ब्लॅक स्पॉट' ठरलेल्या वळणावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप; तातडीने गतिरोधक आणि फलक लावण्याची मागणी.

Junnar Accident – कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील करंजाळे (ता. जुन्नर) गावाजवळ रविवारी (दि. ७ जून) सकाळी भीषण अपघात घडला. हॉटेल छत्रपती समोरील धोकादायक वळणावर पिकअप वाहन आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत खाणगाव (ता. जुन्नर) येथील युवकाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप (क्र. एम.एच. १४ के.ए. ४२७७) वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन भरधाव वेगाने समोरून येणाऱ्या दुचाकीवर (क्र. एम.एच. १४ ई.जे. ७८६३) आदळले.
ही धडक इतकी तीव्र होती की, दुचाकीस्वार पन्नास फूट अंतरापर्यंत फरपटत गेला. अपघातानंतर पिकअप वाहनही पलटी झाल्याचे सांगण्यात आले. तसेच पिकअप चालक घटनास्थळावरून फरार झाला. अपघातात रामदास दशरथ घोगरे (वय ४०, रा. खानगाव, ता. जुन्नर) यांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
गंभीर जखमी अवस्थेत घोगरे यांना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेत पंचनामा केला असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. दरम्यान, करंजाळे परिसरातील या धोकादायक वळणावर वारंवार अपघात होत असल्याने स्थानिक नागरिकांनी तातडीने सुरक्षा उपाययोजना, इशारा फलक आणि वेगनियंत्रण यंत्रणा बसविण्याची मागणी केली आहे.





