खासगी डॉक्टरांना ‘जम्बो ऑफर्स’

सीओईपीच्या मैदानावरील कोविड रुग्णालयात भरतीसाठी “फोनाफोनी’
पुणे – जम्बो कोविड रुग्णालय 24 ऑगस्टला सुरू होणार असल्याचे विभागीय आयुक्तांनी जाहीर केले. मात्र, याठिकाणी उपचार करण्यासाठी डॉक्टरांची फौज उभी करणे आवश्यक असल्याने, मानधनाच्या “जम्बो ऑफर्स’ देत अपरिचित डॉक्टरांमार्फत खासगी डॉक्टर आणि परिचारिकांना कॉल करण्याचे सत्र शहरात सुरू झाले आहे. डॉक्टरांना 50 ते 60 हजार रुपये तर परिचारिकांना 30 ते 40 हजार रुपये वेतन देण्याचेही या ऑफरमध्ये नमूद करण्यात येत आहे.
याबाबत नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली असून याची गांभीर्याने दखल घ्या, असे पत्र त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. डॉ. संदीप गुप्ता आणि डॉ. धनश्री (कॉलवर आडनाव सांगितले जात नाही) या दोन नावांनी खासगी डॉक्टरांना जम्बो हॉस्पिटलमध्ये काम करण्याच्या ऑफर्स दिल्या जात आहेत.
हंगामी कालावधीसाठी शहरात तीन ठिकाणी हे जम्बो हॉस्पिटल्स बांधण्यात येणार आहेत. त्यातील सीओईपीच्या मैदानावर उभारण्यात येणाऱ्या हॉस्पिटलचे काम 24 ऑगस्टपर्यंत होईल, असे आश्वासन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारीच खासदार गिरीश बापट यांना दिले आहे. त्यामुळे झटपट हॉस्पिटलसाठी ही जम्बो भरती खासगी रुग्णालयांमधून केली जात असल्याचा संशय चोरबेले यांनी या कॉल्सच्या प्रकारावरून व्यक्त केला आहे.
महापालिकेने काही दिवसांपूर्वीच कोविडसाठीच सहा महिन्यांसाठी हंगामी डॉक्टर्स आणि परिचारिकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये ज्युनिअर-सीनिअर्सचा समावेश आहे. तसेच काही स्पेशालिस्टही आहेत, असे असताना आता या “जम्बो ऑफर्स’चा परिणाम होऊन ते आणि खासगीतील डॉक्टर, परिचारिका त्यांच्याकडे उपचार घेत असलेल्या रुग्णांना वाऱ्यावर सोडून या डॉ. गुप्ता आणि डॉ. धनश्री यांच्या “ऑफर’ला बळी पडल्या तर करोना विरुद्ध लढ्याची परिस्थिती बिकट होण्याची शक्यता असल्याचे चोरबेले यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.




