जम्बो हॉस्पिटल पुन्हा सुरू होणार

37 कोटींच्या खर्चास स्थायीची मान्यता; पालिकाच चालविणार
पुणे – शहरात नव्याने बाधित होणाऱ्या करोना रुग्णांचा आकडा 2 हजारच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे या साथीचे प्रमाण आणखी वाढल्यास तातडीची बाब म्हणून रुग्णांवर उपचारासाठी शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरील जम्बो कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू केले जाणार आहे. हे सेंटर आणखी तीन महिने वापरता येणार असल्याचा अहवाल मागील आठवड्यात दिल्ली आयआयटीने दिला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाने हे सुरू करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या समोर ठेवला होता. त्यास समितीने मान्यता दिली असल्याचे समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी स्पष्ट केले.
तर 2020- 21 च्या अंदाजपत्रकात या रुग्णालयासाठी 70 कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यातील 37 कोटींचा निधी शिल्लक असून या निधीतून या हॉस्पिटलचा पुढील तीन महिन्यांचा खर्च केला जाणार आहे. तसेच या रुग्णालयात सुरूवातीला 200 बेड उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
जम्बोची लाईफ तीन महिनेच
दरम्यान, स्थायी समितीने हे रुग्णालय सुरू करण्यास मान्यता दिली असली तरी, त्याचा वापर तूर्तास तीनच महिने करता येणार आहे. तर आयआयटी दिल्लीचा स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट येऊन 15 दिवस झाले असून ते सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यास 10 ते 15 दिवसांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे महापालिकेस या ठिकाणी केवळ 2 महिनेच रुग्ण ठेवता येणार आहेत. शहरात सध्या खासगी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध असून शासकीय रुग्णालयातील बेड जवळपास संपलेले आहेत. परिणामी, जम्बो सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यातही दोन महिनेच रुग्ण ठेवता येणार असल्याने रुग्णांचा आकडा असाच वाढत राहिल्यास पालिकेची अडचण वाढणार आहे.





