Judge Murder Case : न्यायाधिश हत्येची सुप्रिम कोर्टाकडून दखल

नवी दिल्ली – धनाबादमधील अतिरिक्त सत्र न्यायाधिशांच्या हत्या ही घृणास्पद घटना असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची स्वत:हून (सु मोटो) दखल घेतली.
मुख्य न्यायाधिश एन. व्ही रमणा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की, न्यायिक अधिकारी आणि विधीक्षेत्रातील व्यक्तींवर देशभर हल्ल्याच्या घटना घडत असल्याने आम्ही या घटनेची सु मोटो दखल घेत आहोत.
मात्र त्याच वेळी झारखंड उच्च न्यायालयाच्या देखरेखी खाली सुरू असणारी चौकशी सुरूच राहील, असे स्पष्ट केले. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधिश उत्तम आनंद यांच्या दु:खद मृत्यूचा तपासातील प्रगतीचा अहवाल एक आठवड्यात देण्याचे आदेश देत आहोत, असे खंडपीठाने स्पष्ट केले. या खंडपीठात न्या. सूर्य कांत यांचाही समावेश होता.
न्या. उत्तम आनंद यांना धनाबादमध्ये एका वाहनाने उडवले. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. नंतर ती सर्वत्र व्हायरल झाली. त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले एका रिक्षा चालकाने पाहिले. त्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांचा त्यांना झालेल्या जखमांमुळे मृत्यू झाला.
गुरूवारी सर्वोच्च न्यायलयाचे अध्यक्ष विकास सिंग यांनी या घटनेचा उल्लेख करत ही घटना न्यायव्यवस्थेच्या स्वतंत्रतेवर झालेला हल्ला असल्याचे नमूद केले. त्यावेळी मुख्य न्यायाधिश एन. व्ही रमणा यांनी मी यासंदर्भात झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांशी बोललो असल्याचे सांगितले. झारखंड उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे.
पोलिस दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्या. आनंद यांनी दिलेल्या निर्णयावरून कोणीतरी सुपारी देऊन ही हत्या घडवली असण्याची शक्यता गृहीत धरून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, प्रत्यक्षात तसा कोणताही संदर्भ सिध्द होऊ शकला नाही. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी वापरलेली रिक्षा झारीया येथून मंगळवारी चोरलेली होती. त्या दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, असे बोकारोचे पोलिस महानिरीक्षक मयुर पटेल यांनी सांगितले.





