Jos Buttler Record : जोस बटलरचा ऐतिहासिक पराक्रम! इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासात जे कोणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं
Jos Buttler Record : या अत्यंत रोमहर्षक सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला असला, तरी अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज जोस बटलरने आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान जागतिक क्रिकेटमध्ये एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.

Jos Buttler 10000 White Ball Runs England vs Sri Lanka 2nd ODI Leeds : हेडिंग्ले मैदानावर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने इंग्लंडचा १६ धावांनी पराभव करत मालिकेत पहिला विजय नोंदवला. या अत्यंत रोमहर्षक सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला असला, तरी अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज जोस बटलरने (Jos Buttler) आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान जागतिक क्रिकेटमध्ये एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. मर्यादित षटकांच्या म्हणजेच ‘व्हाईट बॉल’ क्रिकेटमध्ये (वनडे आणि टी-२० आंतरराष्ट्रीय) १० हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर अधिराज्य; १३ शतकांसह ठोकल्या १०,०६२ धावा!
जोस बटलरने एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय मिळून खेळलेल्या एकूण ३६७ सामन्यांमधील ३२६ डावांत ३७ च्या सरासरीने १०,०६२ धावा कुटल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १३ शतके आणि ६० अर्धशतके झळकली आहेत. एकदिवसीय प्रकारात ५,६७८ धावांसह तो इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये तिसऱ्या स्थानी आहे; तर आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १५० च्या स्ट्राईक रेटने ४,३८४ धावा करत तो इंग्लंडचा अव्वल फलंदाज म्हणून विराजमान आहे.
कुसल मेंडिसचे १२१ धावांचे वादळ; श्रीलंकेचे ३२१ धावांचे तगडे आव्हान!
🚨 Jos Buttler has become the 1st English cricketer to aggregate 10000-plus runs in Men’s limited-overs internationals (ODIs + T20Is).
Do you know how many other cricketers have gone past this mark? 🤔 pic.twitter.com/siYv41ZiMO
— Cricbuzz (@cricbuzz) September 24, 2026
या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाने ५० षटकांत ६ गडी गमावून ३२१ धावांचा डोंगर उभारला होता. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने अवघ्या १०० चेंडूंत १२१ धावांची आक्रमक शतकी खेळी साकारली. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांनी कडवी झुंज दिली; मात्र नियमित अंतराने विकेट्स गमावणे त्यांना महागात पडले.
चार फलंदाजांची अर्धशतके अपुरी; इंग्लंडचा ३०५ धावांवर अडखळला डाव!
इंग्लंडकडून टॉम बँटनने ७३, बेन डकेटने ६७, जोस बटलरने ६९ आणि विल जॅक्सने ५२ धावांची अर्धशतके ठोकली. मात्र, मोक्याच्या क्षणी श्रीलंकन गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यामुळे इंग्लंडचा संघ ५० षटकांत ९ बाद ३०५ धावांपर्यंतच मजल मारू शकला. परिणामी, श्रीलंकेने १६ धावांनी विजय साकारून तीन सामन्यांच्या या मालिकेत पुनरागमन केले आहे.





