Joe Biden : ज्यो बायडेन यांनी मुलाला शस्त्र खरेदी, करचुकवेगिरीच्या आरोपातून केले मुक्त

Joe Biden | Hunter Biden – अमेरिकेचे मावळते अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आपले पुत्र हंटर बायडेन यांना त्यांच्यावरील सर्व आरोपांमधून पुर्णपणे आणि बिनशर्त माफ केले आहे. हंटर बायडेन हे आपले पुत्र असल्यामुळेच त्यांना या प्रकरणांमध्ये गोवण्यात आले होते, असे ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे.
आपल्याला देशातील न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. मात्र या न्याय व्यवस्थेमध्ये राजकारण घुसले आहे. त्यातून न्यायाचे पतन होते आहे. हे लक्षात आल्यावर हंटर बायडेन यांना माफीबाबतच्या निर्णयाला विलंब करण्यात काहीच अर्थ नव्हता, असे बायडेन यांनी रविवारी रात्री प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
हंटर बायडेन यांना या वर्षाच्या प्रारंभी शस्त्रास्त्रांशी संबंधित कायद्यात आणि करचुकवेगिरीच्या आरोपात दोषी ठरवण्यात आले होते. लवकरच त्यांना कॅलिफोर्नियातल्या डेलोन न्यायालयात हजर केले जाणार होते. तेथे त्यांना दीर्घकाळाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता होती.
हंटर बायडेन यांच्याबाबत संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील राजकीय विरोधकांनी चिथावणी दिल्यामुळे आपल्याला अडचणीत आणण्यासाठी हे आरोप केले गेले होते. न्याय व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करणार नाही, असे आपण पहिल्यापासून म्हणत होतो.
माझ्या मुलाला लक्ष्य केले जात होते. शस्त्र खरेदीसाठीच्या फॉर्मवरची माहीती आणि उत्तेजक सेवनाची सवय असल्याबद्दल कोणालाही गुन्हेगार समजले जात नाही. पण हंटर बायडेन यांच्याबाबत वेगळी वागणूक दिली गेली होती, असे बायडेन म्हणाले.
बायडेन यांनी सर्वंकश माफीसाठीच्या कार्यकारी अधिकारांचा वापर केल्यामुळे आता नियोजित अध्यक्ष ट्रम्प देखील हा निर्णय बदलू शकणार नाहीत. बायडेन यांनी केलेल्या या निर्णयावर ट्रम्प यांनी कडाडून टीका केली आहे. बायडेन यांनी न्यायाचा घात केला आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.





