Jodhpur Bus Accident : राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील फलोदी तालुक्यातील मतोडा गावाजवळ रविवारी (२ नोव्हेंबर) संध्याकाळी घडलेल्या एका भयानक रस्ता अपघाताने हाहाकार माजला आहे. जोधपूरच्या सुरसागर परिसरातील १८ भाविकांचा मृत्यू झाला असून, हे सर्वजण बिकानेर जिल्ह्यातील कोलायात येथील प्रसिद्ध कपिल मुनि आश्रमात दर्शन घेऊन परतत होते. टेम्पो ट्रॅव्हलर कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला जोरदार धडकल्याने हा अपघात झाला. जखमींना तात्काळ ओसीएन सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर प्रकृतीच्या ३ जखमींना ग्रीन कॉरिडॉरद्वारे जोधपूरच्या एमडीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य केले असून, या घटनेने राजस्थानभरात शोकाची लाट उसळली आहे. नेमकं अपघात कसा घडला? मिळालेल्या माहितीनुसार, ही टेम्पो ट्रॅव्हलर जोधपूरच्या सुरसागर भागातील भाविकांनी भरील होती. ते कोलायात मंदिरात कपिल मुनि आश्रमाचे दर्शन घेऊन परतत होते. भारतमाला महामार्गावर फलोदी तालुक्यातील मतोडा गावाजवळ पोहोचताना चालकाचे नियंत्रण सुटले. अचानक बस कडेला पार्क केलेल्या ट्रेलरला जोरदार धडकली. ही धडक इतकी प्रचंड होती की, बसचा समोरचा भाग पूर्णपणे चकनाचूर झाला आहे. पोलिस आयुक्त ओम प्रकाश यांनी सांगितले, “बसमध्ये एकूण १८ प्रवासी होते, त्यापैकी ४-५ मुलेही होती. सर्वजण एकाच कुटुंबातील होते. अपघातानंतर ओसियन रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींना जोधपूरला हलवले. मृतदेह ओसियन सरकारी रुग्णालयाच्या मोर्चरीत ठेवले आहेत.” बचावकार्यात स्थानिक ग्रामस्थ आणि जेसीबी मशीनचा वापर करून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. मातोडा पोलिस स्टेशनचे अधिकारी अमनाराम यांच्या नेतृत्वात तपास सुरू असून, चालकाच्या लापरवाहीची शक्यता तपासली जात आहे. प्राथमिक अहवालानुसार, वेगावरून नियंत्रण सुटले असावे, तर काहींनी रस्त्यावरील खराब रस्त्याचीही तक्रार केली आहे.