JM Road Firing Case : कौटुंबिक वादातून पोटच्या मुलाचा गेम? जे.एम. रोडवरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अखेर गजाआड
JM Road Firing Case : पिस्तुलातून गोळी न सुटल्याने वाचला होता जीव; मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या आरोपीचा दोन वर्षांपासूनचा लपंडाव अखेर संपला.

JM Road Firing Case – कौटुंबिक वादातून मुलाच्या हत्येसाठी ७५ लाख रुपयांची सुपारी प्रकरणात पिस्तूल पुरविणाऱ्या एकाला खंडणी विरोधी पथकाने अटक केली. जंगली महाराज रस्त्यावर दोन वर्षांपूर्वी बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयाबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. याप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केल्यानंतर पिस्तूल पुरविणारा आरोपी पसार झाला होता. नीलेश श्रीकांत गायकवाड (वय २४, रा. पिसोळी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
१६ एप्रिल २०२४ रोजी जंगली महाराज रस्ता परिसरात बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर पिस्तुलातून गाेळीबार झाला होता. मात्र, पिस्तुलातून गोळी न उडाल्याने मुलगा वाचला. या घटनेनंतर दुचाकीवरून हल्लेखोर पसार झाले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. तपासात कौटुंबिक वादातून बांधकाम व्यावसायिक पित्याने मुलाची हत्या करण्यासाठी दोघांना ७५ लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती मिळाली. पाेलिसांनी बांधकाम व्यावसायिकासह हल्लेखोरांना अटक केली होती.
गोळीबार प्रकरणात पिस्तूल पुरविणारा आरोपी गायकवाड पसार झाला होता. खंडणी विरोधी पथकातील कर्मचारी पिसोळी भागात गस्त घालत असता, गायकवाड हा आईला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील नितीन मुंढे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून गायकवाडला पकडले. पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, साहील शेख यांनी ही कारवाई केली.





