JK: काश्मीर खोऱ्यात सलग दोन वेळा भूकंप , नागरिकांमध्ये घबराट

JK । जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये मंगळवारी सकाळी सलग दोन भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आणि त्यांनी घराबाहेर पडून आपल्या प्रियजनांना फोन करून त्यांची प्रकृतीची विचारपूस केली. आजच्या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.9 इतकी नोंदवण्यात आली. त्याचबरोबर पाकिस्तानातील इस्लामाबादमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहे.
स्थानिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की,’पहिला भूकंप संध्याकाळी 6.45 वाजता झाला. काही मिनिटांतच दुसरा भूकंप झाला. पहिला भूकंप 34.37 अंश उत्तर अक्षांश आणि 74.16 अंश पूर्व रेखांशावर झाला. दुसऱ्या भूकंपाची तीव्रता 4.9 मोजण्यात आली आणि तो संध्याकाळी 6.52 वाजता आला. भूकंपाचा केंद्रबिंदू बारामुल्ला होता आणि तो अनुक्रमे 5 आणि 10 किलोमीटर खोलीवर होता.’
काश्मीर खोरे भूकंप झोन 5 मध्ये येते
भारतीय मानक ब्युरो (BIS) ने तयार केलेल्या भूकंपीय क्षेत्रीय नकाशानुसार, ‘भूकंपाच्या जोखमीच्या संदर्भात भारताची चार विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या झोनपैकी झोन 5 मध्ये सर्वाधिक भूकंपाचा धोका आहे आणि झोन 2 मध्ये सर्वात कमी धोका आहे. काश्मीर खोरे आणि डोडा जिल्ह्यातील सर्व जिल्हे भूकंपप्रवण झोन 5 मध्ये येतात आणि उर्वरित जिल्हे भूकंपाच्या झोन 4 मध्ये येतात. 2005 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये मोठा भूकंप झाला होता. या भूकंपाची तीव्रता 7.6 इतकी होती, ज्यामुळे प्रचंड विध्वंस झाला. हा विध्वंस मुख्यतः सीमावर्ती गावांमध्ये, विशेषत: बारामुल्ला आणि कुपवाडा जिल्ह्यांमध्ये झाला.
रशियातही आला भूकंप
अलीकडेच रशियात भूकंपाने पृथ्वी हादरली. युरोपियन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्र (EMSC) ने नोंदवले आहे की, शनिवारी रशियाच्या कामचटका प्रदेशाच्या पूर्व किनारपट्टीवर 7.2 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याची खोली 51 किमी होती. भूकंपानंतर लगेचच सुनामीचा इशारा देण्यात आला. भूकंपानंतर अमेरिकेच्या राष्ट्रीय त्सुनामी चेतावणी केंद्राने सुनामीचा इशारा दिला होता. रशियन आपत्कालीन मंत्रालयाच्या कामचटका शाखेने सांगितले होते की, कामचटका किनारपट्टीवर ७.२ तीव्रतेच्या भूकंपानंतर सुनामीचा धोका नाही.





