Jitendra Kumar Birthday: इंजिनिअर ते OTTचा बादशाह; जाणून घ्या जितेंद्र कुमारचा प्रवास

Jitendra Kumar Birthday: लोकप्रिय अभिनेता जितेंद्र कुमार आज आपला ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. राजस्थानमधील अलवर येथे १९९० साली जन्मलेल्या जितेंद्रने सुरुवातीला इंजिनिअरिंगचा मार्ग निवडला होता. आयआयटी खरगपूरमधून सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने जपानी कंपनीत नोकरीही केली. पण मन मात्र अभिनयात गुंतलेले होते. कॉलेजच्या काळात तो थिएटरशी जोडला गेला आणि त्यानंतर त्याची वाटचाल थेट अभिनयाच्या दिशेने झाली.
जितेंद्रने दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये अर्ज केला, परंतु त्याला प्रवेश मिळाला नाही. तरीही हार न मानता त्याने मुंबई गाठली. २०१९ साली आलेली वेब सिरीज कोटा फॅक्टरी त्याच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरली. ‘जीतू भैय्या’ या भूमिकेत त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. विद्यार्थ्यांनी त्याला खऱ्या आयुष्यातही मार्गदर्शक मानले. त्यानंतर आलेल्या पंचायत मालिकेत त्याने साधेपणाने आणि सहज अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. सचिवजींच्या भूमिकेमुळे तो घराघरात पोहोचला.
फक्त OTT नव्हे तर सिनेमांमध्येही त्याने आपले वेगळेपण दाखवले. आयुष्मान खुरानासोबतच्या शुभ मंगल ज्यादा सावधान या चित्रपटात त्याच्या बहुआयामी अभिनयाचे दर्शन घडले. कॉमेडी असो किंवा भावनिक सीन, जितेंद्र प्रत्येक भूमिकेला वास्तवतेची किनार देतो. त्यामुळेच त्याला आज “OTT चा बादशाह” म्हटले जाते.
आज जितेंद्र कुमार करोडो रुपये कमावतो. रिपोर्ट्सनुसार त्याची नेट वर्थ सुमारे ७ कोटी आहे. त्याच्याकडे आलिशान घर, लक्झरी कार्स आहेत. पण त्याची खरी ओळख म्हणजे त्याची साधेपणा आणि नैसर्गिक अभिनयशैली. जीतू भैय्या पासून सचिवजीपर्यंतच्या भूमिकांनी तो प्रेक्षकांच्या हृदयात कायमची जागा मिळवून बसला आहे.




