“थोडी तरी लाज बाळगा! कारागृहातही वाल्मिकची गँग जमली, रोज मैफील अन्..” ; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याचा गंभीर आरोप

Jitendra Awhad On Walmik Karad । बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या बीडच्या कारागृहात आहे. मात्र त्याचे प्रशासनासोबत असणाऱ्या संबंधांचे रोज नवीन किस्से समोर येत आहेत. याचविषयी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे वरिष्ठ नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या एका पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. यामध्ये त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
” …हे या आधी महाराष्ट्राने कधीही पाहिले नाही” Jitendra Awhad On Walmik Karad ।
जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्यातून सनसणाटी आरोप केले आहेत. बीडच्या कारागृहात असलेल्या वाल्मिक कडाच्या दिमतीला सात पोलिस हवालदार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच कराडच्या गँगमधील छोटे-मोठे गुन्हेगार तुरुंगातही जमले असून त्यांची रोज मैफील जमत असल्याचा खळबळजनक दावा देखील त्यांनी या पोस्टच्या माध्यामातून केला आहे. “कायद्याने जामीन नाकारलेल्या एखाद्या आरोपीच्या दिमतीला एवढे हवालदार आहेत हे या आधी महाराष्ट्राने कधीही पाहिले नाही” असं जितेंद्र आव्हाड म्हणतात. वाल्मिक कराड हा सरकारपेक्षाही मोठा असून त्याने तुरुंगातही निवांत राहावं असाच निर्णय शासन दरबारी झाल्याचा दिसतोय असा आरोप आव्हाडांनी यावेळी केला.
हाॅस्पीटलमधून बाहेर काढलेल्या वाल्मिक कराडला आता बीडच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. बंदीवासात त्याच्या दिमतीला सात हवालदार तैनात ठेवलेले आहेत. बीडमधील त्याच्या गँगमधील छोटे – मोठे गुन्हेगार मुद्दामहून स्वतःवर एखादा गुन्हा ओढावून घेतात अन् या गुन्हेगारांची रवानगी बीड…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 27, 2025
बंदीवासात त्याच्या दिमतीला सात हवालदार तैनात Jitendra Awhad On Walmik Karad ।
पुढे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये “हॉस्पिटलमधून बाहेर काढलेल्या वाल्मिक कराडला आता बीडच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. बंदीवासात त्याच्या दिमतीला सात हवालदार तैनात ठेवलेले आहेत. बीडमधील त्याच्या गँगमधील छोटे-मोठे गुन्हेगार मुद्दामहून स्वतःवर एखादा गुन्हा ओढावून घेतात अन् या गुन्हेगारांची रवानगी बीड मध्यवर्ती कारागृहात होते. बीड कारागृहात ते ‘आपोआप’ वाल्मिक कराडच्या जवळ पोहचतात आणि मग, रात्री मस्त मैफिल रंगत असते. एकंदरीत तो कारागृहात आहे, अशी भावनाच त्याच्या मनात निर्माण होऊ द्यायची नाही, असा निर्णय शासन दरबारी झालेला दिसतो. बाकी महाराष्ट्रात आजपर्यंत असे कधी बघितलेले नाही की, कायद्याने जामीन नाकारलेल्या इसमाला एवढे हवालदार दिमतीला तैनात केले आहेत ! अर्थात, तो वाल्मिक कराड आहे… वाल्मिक खडा तो वो सरकारसे बडा !! थोडी तरी लाज बाळगा.” असे म्हणत त्यांनी सरकार आणि तुरुंग प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
बीडमध्ये 26 पोलिस वाल्मिक कराडच्या मर्जीतले
भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनीही वाल्मिक कराड आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या संबंधावर आरोप केले आहेत. बीडमधील 26 पोलिस अधिकारी वाल्मिक कराडच्या मर्जीतील आहेत असा आरोप त्यांनी केला. तसेच या सर्व अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणीही त्यांनी केली.





