” पण हा माणूस नशीबवान, सगळे होऊनसुद्धा दादा छातीचा कोट करून उभे ” ; आव्हाडांकडून अजित पवार, मुंडेंवर टीका

Jitendra Awhad on Ajit Pawar । बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांमुळे सध्या धनंजय मुंडे हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. विरोधकांकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे मात्र या मागणीकडे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार हे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. याच अजित पवारांच्या भूमिकेवर आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.
अजित पवारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह Jitendra Awhad on Ajit Pawar ।
बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी परळीत आले असताना अजित पवार यांनी धनंजय मुंडे आणि त्यांच्या समर्थकांना अप्रत्यक्षपणे कानपिचक्या दिल्या. मात्र, धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांची सोशल मीडियावर एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टमधून जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांनी धनंजय मुंडे यांच्याप्रमाणे आपली दखल घेतली नव्हती, अशी खंत बोलून दाखवली आहे.
दादा छातीचा कोट करून उभे आहेत Jitendra Awhad on Ajit Pawar ।
धनंजय मुंडे यांच्यावर इतके गंभीर आरोप होऊनही अजित पवार यांनी त्यांना अभय दिले आहे. याविषयी जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “पण हा माणूस नशीबवान आहे सगळे होऊनसुद्धा दादा छातीचा कोट करून उभे आहेत. मी किती कमनशिबी आहे . 2019 मंत्री झालो पालक मंत्री साठी चढाओढ सुरू झाली मला पालघर जिल्हा मिळेल असे मला वाटत होते, पण एकनाथ शिंदे साहेबांनी मला बाजूला घेऊन सांगितले की दादा रायगड जिल्हा सोडत नाहीत माझे तीन आमदार आहेत पण हट्ट धरून बसले आहेत पालघर घ्या, रायगड सोडा आणि दादांनी मला सांगितले शिंदे साहेब पालघर सोडत नाहीत.
सत्य देवाला माहीत पण मी काही पालकमंत्री होऊ शकलो नाही. मग मी साहेबांमुळे सोलापूरचा पालक मंत्री झालो आणि मला कोरोनाची लागण झाली आणि काही तासात मला काढून भरणे मामांना जबाबदारी मिळाली दादा थोडे दिवस थांबले असते तर … अशा खूप जखमा आहेत. पण कधीच हिशोब दिला नाही, की मी हे केले मी ते केले. 2004 ते 2014 जेव्हा कोणी उभे राहायला तयार नव्हते, तेव्हा सगळ्या अवघड प्रसंगात विरोधकांशी उघडपणाने दोन हात करायची आणि दाखले देत आरोप पलटवून लावायचो पण कधी व्यासपीठावरून त्याचे दाखले देऊन. मीच करतो मीच करतो असे केले नाही, कदाचित दादांना हे वागणे आवडत असावे,” असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.





