Jio Frames Announced – रिलायन्स जिओने आपला नवा एआय-पावर्ड स्मार्ट चष्मा ‘Jio Frames’ लाँच केला असून, हा स्मार्ट वेअरेबल थेट अमेरिकन कंपनी मेटाच्या RayBan स्मार्ट ग्लासेसला टक्कर देणार आहे. कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) याची घोषणा केली. फोटो, व्हिडिओ, कॉलिंग आणि म्युझिकसह एआय सपोर्ट या स्मार्ट चष्म्यात इनबिल्ट ओपन-इअर स्पीकर्स देण्यात आले आहेत. त्याद्वारे थेट चष्म्यातून कॉलिंग करता येईल, कॉल रिसिव्ह करता येईल आणि गाणीही ऐकता येतील. एचडी दर्जाचे फोटो कॅप्चर करण्याची तसेच व्हिडिओ रेकॉर्ड करून थेट सोशल मीडियावर शेअर करण्याची सोय यामध्ये आहे. याशिवाय हा चष्मा मोबाईल अॅपशी जोडता येईल, ज्यात फोटोज आणि व्हिडिओ सेव्ह होतील. भारतीय भाषांमध्ये सपोर्ट, लाईव्ह ट्रान्सलेशन सुविधा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या चष्म्यात ‘Jio Voice AI’ नावाचा व्हॉईस असिस्टंट दिला आहे. वापरकर्ते थेट चष्म्यातून प्रश्न विचारू शकतात. उदाहरणार्थ – स्वयंपाक करताना रेसिपी विचारल्यास हा चष्मा स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन करेल. तसेच अनेक भारतीय भाषांचा सपोर्ट असल्याने लाईव्ह ट्रान्सलेशन सुविधाही वापरता येणार आहे. कुठल्याही उत्पादनावर, बोर्डावर किंवा मेन्यूवर नजर टाकल्यास हा चष्मा थेट त्याचे भाषांतर करून दाखवेल. Meta RayBan पेक्षा स्वस्त असण्याची शक्यता सध्या मेटा RayBan स्मार्ट ग्लासेसची भारतातील किंमत साधारण ३५ हजार रुपयांपासून सुरू होते. मात्र, जिओने आपल्या Jio Frames ची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. तरीही, जिओची उत्पादने नेहमीच परवडणाऱ्या दरात उपलब्ध होत असल्याने हे स्मार्ट ग्लासेस तुलनेने स्वस्त मिळतील, अशी अपेक्षा आहे.