New Recharge Plans: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) आदेशानंतर टेलिकॉम कंपन्यांकडून नवीन रिचार्ज प्लॅन्स लाँच करण्यात आले आहेत. ज्या ग्राहकांना डेटाची गरज नाही अशा ग्राहकांना डेटासाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागू नये, यासाठी ट्रायद्वारे कंपन्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. त्यानंतर आता जिओ, एअरटेल आणि व्हीआय कंपन्यांकडून केवळ कॉलिंग व एसएमएस सुविधेसह येणारे प्रीपेड प्लॅन्स सादर करण्यात आले आहेत. जिओचे रिचार्ज प्लॅन टेलिकॉम कंपनी जिओने ग्राहकांसाठी 458 रुपये आणि 1958 रुपयांचे प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहे. कंपनीच्या 458 रुपयांच्या प्लॅनची मुदत 84 दिवस असून, यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि 1000 एसएमएसची सुविधा मिळते. तसेच, 1958 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि एकूण 3600 एसएमएस दिले जातात. या प्लॅन्समध्ये कोणत्याही प्रकारचा डेटा मिळत नाही. याशिवाय, ग्राहकांना JioTV, JioCloud आणि JioCinema सारख्या जिओ अॅपचा मोफत अॅक्सेस मिळतो. व्हीआयचा रिचार्ज प्लॅन व्हीआयने केवळ वॉइस कॉलिंग आणि एसएमएसच्या सुविधेसह येणारा 1460 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला 270 दिवसांसाठी देशभरात अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि 100 मोफत एसएमएसची सुविधा मिळेल. एअरटेलचे प्रीपेड प्लॅन्स एअरटेलने ग्राहकांसाठी केवळ वॉइस कॉलिंग आणि एसएमएसच्या सुविधेसह येणारे दोन प्लॅन लाँच केले आहे. कंपनीच्या 499 रुपये आणि 1959 रुपयांच्या प्लॅनची वैधता अनुक्रमे 84 दिवस आणि 365 दिवस आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच, अपोलो 24/7 सर्कल मेंबरशिप आणि मोफत हॅलो ट्यून्सचा फायदा मिळेल. एअरटेलच्या 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 900 एसएमएस आणि 1959 रुपयांच्या प्लॅनमध्ये 3600 एसएमएस दिले जातात.