प्रभात वृत्तसेवा जवळार्जुन – जेजुरी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण हे सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी जाहीर झाल्यामुळे जेजुरीतील इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर दोन ते तीन वर्षे निवडणूक लढण्याची तयारी करणाऱ्यांनी लगेच सोशल नेटवर्किंगवरुन संपर्क फोनाफोनी सुरु केली आहे. इच्छुकांनी हायकमांडकडे आपल्या नावासाठी समर्थक कार्यकर्त्यांना श्रेष्ठींकडे आपल्या नावाचा आग्रह धरण्यासाठी फिल्डींग सुरू करावी, निरोप पाठविण्यासाठी सुरुवात केली आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्षपद आरक्षण इतर मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित होते. यावेळी आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी येईल, अशी अपेक्षा धरत अनेकांनी जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला होता. आरक्षण सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी झाल्यामुळे त्यांना मोठी संधी निर्माण झाली आहे. मागील निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना अशी तिरंगी लढत झाली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये खरी लढत झाली होती. मात्र, आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वच पक्षांमध्ये झालेली स्थित्यंतरे आणि सद्य परिस्थिती वेगळी निर्माण झाली आहे. सात ते आठ वर्षात बरेच पुलाखालून पाणी वाहून गेलेले आहे. स्थानिक पातळीवर कोणाची युती होणार? नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट एकत्र येणार का, याबाबत अद्याप सस्पेन्स आहे. अजून काहीही सांगता येत नाही. मात्र, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना शिंदे गट, मनसे यांचे नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार असण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. दोन ते अडीच वर्षे निवडणूक लांबणीवर गेल्याने आणि नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गामुळे काटा लढतीची शक्यता वर्तवली जात आहे. महायुती आघाडी धर्म पाळणार काय.. जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर कोणता पक्ष कोणाशी युती करणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. राज्याच्या सत्तेत असलेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये युती होणार का, असा संभ्रम नागरिकांमध्ये आहे. मनसेची भूमिका काय असणार, याबाबत चर्चा सुरू आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे वक्तव्य केल्यानंतर महायुतीमधील घटक पक्ष हे आघाडी धर्म हे कितपत पाळणार, याचीच चर्चा रंगली आहे.