Jejuri News : स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ…जेजुरी गडावरच्या ‘त्या’ गुप्त शिवलिंगाचं रहस्य काय? भक्तांची अलोट गर्दी
Jejuri News : जेजुरी गडावरील मुख्य मंदिराच्या कळसात आणि गर्भगृहात दडलेल्या गुप्त शिवलिंगाचे दर्शन; महाशिवरात्रीच्या निमित्ताने अनोखी परंपरा संपन्न.

Jejuri News – हर हर महादेव, जय जय शंकर, शिव शिव शंकर शंभो, असा गजर करीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवभक्तांनी जेजुरी खंडोबा गडावरील त्रैलोकीच्या शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी गडकोट परिसर शिवमय झाला होता. यावर्षी देवसंस्थान विश्वस्त मंडळ, पोलीस व महसूल तसेच ग्रामस्थ खांदेकरी, पुजारी सेवेकरी मंडळाच्या वतीने चोख बंदोबस्त व नियोजन व्यवस्था केली होती.
खंडोबा गडाच्या मुख्य मंदिराच्या गर्भगृहात गुप्त शिवलिंग असून याला पाताळलोकीचे तर मुख्य मंदिराच्या कळसामधील शिवलिंगाला स्वर्गलोकीचे शिवलिंग समजले जाते. मुख्य मंदिरातील शंकर-पार्वतीचे वास्तव्य असलेले भूलोकीचे स्वयंभू शिवलिंग समजले जाते. भूलोकीचे शिवलिंग वर्षभर देवदर्शनासाठी भाविकांसाठी खुले असते. मात्र, स्वर्गलोक व पाताळलोकीचे शिवलिंगे वर्षातून एकदाच म्हणजे फक्त महाशिवरात्रीदिवशी धार्मिक विधी आणि दर्शनासाठी खुली केली जातात म्हणूनच धार्मिक विधी व दर्शनाला त्रैलोकीचे दर्शन, असे म्हणतात.
शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. त्यामुळे यात्रेला विशेष महत्व आहे. महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त शनिवारी (दि.१४) सायंकाळपासूनच जेजुरी शहरासह गडकोट पायरीमार्गावर भाविकांची गर्दी होऊ लागली होती. शनिवार संपताच रात्री १२ नंतर मुख्य मंदिरातील शिवलिंगाच्या अभिषेक व धार्मिक विधीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी मार्तंड देवसंस्थानचे सर्व विश्वस्त, अधिकारी, ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी, मानकरी, सेवेकरी पुजारी उपस्थित होते.
मुख्य मंदिर व गाभाऱ्यात फुलांची सजावट
पाताळलोक व कळसातील स्वर्गलोकीच्या शिवलिंगाची विधिवत अभिषेक, पूजा झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले केले. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनाकरिता रांगा लावल्या होत्या. देवसंस्थान व्यवस्थापन, पोलीस प्रशासन यांच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात केला होता. पिण्याच्या पाण्याची तसेच फराळ व्यवस्था केली होती. गडकोट आवाराला आकर्षक विद्युत रोषणाई मुख्य मंदिर व गाभाऱ्यात पानाफुलांची सजावट केली होती.
लवथळेश्वर- बल्लाळेश्वर मंदिरातही रांगा
रामदास स्वामींच्या वास्तव्याने आणि १६ व्या शतकातील सरदार राघो मंबाजी खटावकर यांनी जीर्णोद्धार केलेल्या जेजुरी शहरातील पश्चिम दिशेला असलेल्या पुरातन ऐतिहासिक लवथळेश्वर मंदिर तसेच पूर्व दिशेला श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी निर्माण केलेल्या ऐतिहासिक बल्लाळेश्वर मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. बल्लाळेश्वर विकास प्रतिष्ठान तसेच हभप. एन. डी. जगताप यांच्या वतीने धार्मिक विधी, फराळ वाटपाचे आयोजन केले होते.






