बिहारच्या सिद्धेश्वर नाथ मंदिरात चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री नितीश कुमारांची प्रत्येकी 4 लाख रुपये देण्याची घोषणा

पाटणा: बिहारच्या जेहानाबाद जिल्ह्यातील बाबा सिद्धेश्वर नाथ मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये देण्याची घोषणा –
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. वृत्तानुसार, काही तरुण भाविक आणि स्थानिक दुकानदार यांच्यात झालेल्या वादातून चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती.
चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू झाला –
12 ऑगस्ट (सोमवार) रोजी श्रावणी जत्रेतनिमित्त मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. भाविक तरुण आणि स्थानिक दुकानदारांमध्ये झालेल्या वादावादीनंतर मंदिराचे प्रांगण आणि रस्ता अरुंद रस्यावर धावपळ सुरु झाली. यातच चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झाला. या घटनेत 16 जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी उपस्थित जखमी भाविकांना वैद्यकीय पथक व नियंत्रण कक्षाच्या मदतीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, असे जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. ज्यामध्ये 10 भाविकांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. जखमी सर्व भाविकांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
असे सांगितले जात आहे की, बाराबार हिलच्या शिखरावर असलेल्या बाबा सिद्धेश्वर नाथ मंदिराची भौगोलिक स्थिती अत्यंत आव्हानात्मक आहे. अचानक घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, प्रशासनाने योग्य ती व्यवस्था केली नसल्याचा आरोपही अनेक प्रत्यक्षदर्शी करत आहेत. वादात सहभागी असलेल्या स्थानिक लोकांची पोलीस ओळख पटवत आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सूचनेनुसार, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि जखमी भाविकांना प्रत्येकी 50 हजार रुपये आपत्ती सानुग्रह अनुदानाअंतर्गत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 24 तासांच्या आत मदत निधी वितरीत केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.





