भाऊच्या रॅलीसाठी चॉपर दाखवून नेली जीप; निलेश घायवळ टोळीतील आठ जणांवर गुन्हे दाखल

पुणे – गजा मारणे रॅली प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी शहरातील गुंडांवर कठोर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. गजा मारणे, शरद मोहोळनंतर आता पोलिसांनी निलेश घायवळ टोळीवर लक्ष केंद्रीत केले आहे. निलेश घायवळ टोळीतील आठ सदस्यांवर गुन्हे दाखल करुन त्यातील दोन सदस्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई खंडणी विरोधी पथकाने केली आहे. संबंधीत आरोपींनी भाऊच्या(निलेश घायवळ) रॅलीसाठी एकाला चॉपरचा धाक दाखवून जबरदस्तीने त्याच्याकडून जीप गाडी नेली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कोथरुड येथे रहाणाऱ्या एका व्यक्तीने फिर्याद दिली आहे. घायवळ गॅंगचा सदस्य संतोष धुमाळ याने साथीदारांना फिर्यादीकडील जीप गाडी रॅलीसाठी आणण्यास सांगितले होते. त्यानूसार कुणाल कंधारे, मुसाफ इलाही, शेख, अक्षय गोगावले, विपुल माझीरी व त्यांच्या तीन साथीदारांनी चॉपरचा धाक दाखवत तीन लाखाची महिंद्रा जीप जबरदस्तीने नेली होती.
गुन्हा दाखल झाल्यावर संतोष धुमाळ (38, रा.मुळशी) व मुसा इलाही शेख (29, रा.कोथरुड) यांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंजाड, श्रीकांत चव्हाण, अंमलदार विनोद साळुंके, प्रदिप शितोळे, विजय गुरव, शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, प्रविण पडवळ व प्रदीप गाडे यांच्या पथकाने केली.
निलेश घायवळने जामिनावर सुटल्यावर नगर जिल्हयात समाजकार्य करण्यास सुरवात केली आहे. पुणे पोलिसांच्या भितीने व सातत्याने होत असलेल्या तडीपारीमुळे त्याने आपला मोर्चा नगरमध्ये हलवला आहे. तो तेथूनच टोळीची सूत्रे हलवत आहे.
गजा मारणे, शरद मोहोळ, निलेश घायवळ असे गुन्हेगारीतील बडे प्रस्थ सध्या जामिन किंवा केस निकाली निघाल्याने बाहेर आहेत. एकेकाळी एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले हे गुन्हेगार बाहेर सुटल्याने पुन्हा एकदा टोळी युध्द भडकण्याची शक्यता सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरवात केली आहे.





