अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांनी पत्नीविषयी केले विचित्र वक्तव्य, नेटकरी भडकले; व्हीडिओ व्हायरल

JD Vance Remark On Usha Vance | अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स हे मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सी यांच्यासोबत झालेल्या शाब्दिक वादानंतर आता त्यांनी पत्नीविषयी केलेल्या वक्तव्याची चर्चा होत आहे. जेडी वेन्स यांनी त्यांची पत्नी उषा वेन्स यांना उद्देश केलेले वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच, नेटकऱ्यांकडून यावरून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे.
मिशिगन येथे एका कार्यक्रमात बोलताना जेडी वेन्स म्हणाले की, ‘मला वाटते की त्या अमेरिकेच्या सेकंड लेडी म्हणून खूप चांगले काम करत आहे आणि मला तिच्यासोबत असल्याचा खूप अभिमान आहे. गोष्ट अशी आहे की, कॅमेरे सर्वत्र असल्याने, मी काहीही बोललो तरी व ते कितीही वेडेपणाचे असले तरी, उषा हसते आणि ते साजरे करते.’ व्हीडिओमध्ये जेडी वेन्स यांच्या विधानावर उषा हसताना देखील दिसत आहे.
Vance: Here’s the thing. The cameras are all on; anything I say, no matter how crazy, she has to smile, laugh, and celebrate it. pic.twitter.com/KO36G1D7ju
— Acyn (@Acyn) March 14, 2025
जेडी वेन्स यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांना त्यांचे हे वक्तव्य पटलेले नाही. एका यूजरने व्हीडिओवर कमेंट केली की, उषा वेन्स यांचे अभिनंदन. त्या एक प्रसिद्ध वकील राहिल्या आहेत. पण आता त्या फक्त एक सजावटी चीअरलीडर बनल्या आहेत. तर एका व्यक्तीने तीव्र नाराजी व्यक्त करत लिहिले की, ‘आपल्या पत्नीची थट्टा करणे ही अभिमानाची गोष्ट नाही.’ इतर यूजर्सने देखील अशाच प्रकारच्या कमेंट्स करत वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, जेडी वेन्स हे पत्नी उषासोबत उपराष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, ते या महिन्याच्या अखेरीस भारतात येण्याची शक्यता आहे. उपराष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर वेन्स हे पहिल्यांदा फ्रान्स आणि जर्मनीला गेले होते. त्यानंतर आता ते भारतात येणार आहेत.





