Jaykumar Gore vs Ramraje Naik Nimbalkar : माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी चौकशी प्रकरणात वडूज पोलीस रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी दाखल झाले आहेत. महिलेने मंत्री जयकुमार गोरे यांना बदमानीची धमकी देत खंडणीची मागणी केली होती. महिलेला खंडणी घेत असताना पोलिसांनी अटक देखील केली होती. या प्रकरणात चौकशीसाठी माजी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांना नोटीस बजावण्यात आली होती. आज मात्र, (शुक्रवार) थेट वडूज पोलिस रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही घटना समोर येताच जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले असून, जयकुमार गोरे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील संघर्ष नव्या वळणावर पोहोचला आहे. संबंधित महिलेला 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना सातारा पोलिसांनी अटक केली होती. मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणात याआधी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांची देखील या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. त्यांना देखील चौकशीसाठी नोटीस देण्यात आली होती. रामराजे नाईक निंबाळकर यांना चौकशीला हजर राहण्यासाठी वडूज पोलिसांनी नोटीस दिली होती. मात्र, या नोटीशीनंतर देखील रामराजे हे पोलिस ठाण्यात हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांच्या निवास्थानी पोलिस दाखल झाले आहेत. त्यानंतर आता रामराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू केली आहे, वडूज पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी रामराजे यांच्यासह 11 जणांना समन्स बजावले आहे. या घटनेने साताऱ्यात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकं प्रकरण काय? सातारा जिलह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी 2016 पासून फक्त सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असल्यानेच आपल्याला त्रास दिल्याचा आरोप महिलेने केला होता. तर आपल्याला त्रास देण्यासाठी गोरे यांनी त्यांचे विवस्त्र फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले, असाही दावा सदर महिलेने केला होता. तर होणाऱ्या या त्रासाला कंटाळून सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंद झाला आहे. पण अटक टाळण्यासाठी गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण त्यांचा अटकपर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना अटक झाली होती. ज्यानंतर गोरे यांना दहा दिवसांसाठी जेलमध्येही जावे लागले, असे या महिलेने एका पत्रात म्हटले होते. यावरून मंत्री गोरेंना विरोधकांनी धारेवर धरलं होतं, त्यानंतर या प्रकरणात कारवाई करत संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याशिवाय, ज्या महिलेने आरोप केल्याचा दावा केलाय जातोय, त्या महिलेशी संबंधित प्रकरण कोर्टाने आधीच निकाली काढण्यत आले असल्याचे गोरे यांनी सांगितले आहे. या प्रकरणी विधानसभेत हक्कभंगही दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. ‘लय भारी’ या यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषा रखरात यांच्याविरोधात खंडणीची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. तसेच या प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाशी संबंधित काही नेते गुंतले असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.