300 गाड्यांचा ताफा, 400 अधिकारी दिमतीला.. करोडोंचा खर्च ! मंत्रिमंडळ बैठकीवर जयंत पाटलांची सडकून टीका

मुंबई – “नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याला 112 क्विंटल कांद्याचे अवघे 252 रुपयाचे अनुदान दिले आहे आणि दुसरीकडे मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीसाठी कोटी रुपये खर्च केले जात आहे. मंत्र्यांचा शाही थाट आणि शेतकऱ्यांची क्रूर थट्टा,’ असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मंत्र्यांच्या थाटावर कडक शब्दांत टीका देखील केली आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक शनिवारी होत आहे. बैठकीसाठी गेल्या काही दिवसांपासून यंत्रणेची लगबग सुरु असून बैठकीसाठी वाहन, हॉटेल्स, विश्रामगृह आरक्षित करण्यात आले आहे. दरम्यान, या बैठकीच्या तयारीसाठी शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकासत्रही सुरु असून मंत्रिमंडळासाठी सुमारे 400 अधिकारी दिमतीला असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या बैठकीसाठी आजपासूनच (शुक्रवारी) काही मंत्री शहरात दाखल होत आहे. तर काही मंत्री शनिवारी सकाळी दाखल होतील. मंत्रिगणासाठी शासकीय विश्रामगृहासह, हॉटेल रामा आणि ताज या पंचतारांकित हॉटेल्समधील खोल्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. या निमित्ताने विश्रामगृहांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या सगळ्यावरूनच पाटील यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे.
लोकांच्या पैशांवर माज…
फेब्रुवारी-मार्च महिन्यात अत्यल्प भावात कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून प्रती क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खात्यावर फक्त 252 रुपये टाकण्यात आले. एकीकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी फाईव्ह स्टार हॉटेल्स, 300 गाड्यांचा ताफा, दीड हजार रुपयांची जेवणाची एक थाळी असा शाही थाट… आणि दुसरीकडे मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्याला अवघे 252 रुपये अनुदान जमा करत सरकारने क्रूर थट्टा केली आहे. लोकांच्या पैशांवर मजा करणाऱ्यांना जागतिक लोकशाही दिनाच्या शुभेच्छा, असे सरतेशेवटी म्हणत जयंत पाटलांनी म्हटले आहे.





