Jayant Patil : थोड्याच दिवसात जयंत पाटील कमळ हाती घेणार; ‘या’ नेत्याचा मोठा दावा
सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शिवसेना महायुतीच्या जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर तिखट टीका केली.

Jayant Patil : सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शिवसेना महायुतीच्या जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर तिखट टीका केली.
सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या राजकीय भविष्याबाबत स्फोटक विधान करताना सांगितले की, “आता काटा उलटा फिरायला लागलाय, लई दिवस ते तिकडे बसणार नाहीत. थोड्या दिवसात ते भाजपात येतील.” तसेच, त्यांना भाजपमध्ये घ्यायचे की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी तत्कालीन परिस्थितीनुसार घ्यावा, असेही ते म्हणाले.
सभेत सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांना थेट नाव न घेता चिमटे काढले. ते म्हणाले, “ते बाळ सत्तेशिवाय जगू शकत नाही. सत्तेविना ते जगू शकत नाहीत. कधी उडी मारायची यासंदर्भात ते चाचपणी करीत आहेत.” यासोबतच त्यांनी जयंत पाटील यांच्या २० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीवर प्रश्न उपस्थित केले.
“जयंत पाटील २० वर्षे मंत्री होते. वाळवा शेरगावचा पूल २० वर्ष त्यांनी का केला नाही? २० वर्षांत त्यांनी पाणंद रस्ते का केले नाहीत? या परिसरात त्यांनी पाणी योजना का केल्या नाहीत? कारण त्यांना विकास करायचा नाही. जनतेला त्यांना गरिबीतच ठेवायचे आहे,” अशी तीव्र टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
पुढे ते म्हणाले, “आता काटे उलटे फिरायला लागले आहेत. थोड्या दिवसात ते भाजपमध्ये येतील. संधी पाहून ते उडी मारतील.” सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांच्या विकासकामांच्या अभावावर भर देताना सांगितले की, त्यांनी जनसेवेचे एकही काम केले नाही.
“क्रांतिसिंह नाना पाटील यांचे स्मारक या भूमीत व्हावे, असे कधीही त्यांच्या मनात आले नाही. समाजासाठी त्यांचे कोणतेही काम नाही. जनसेवेचे एक काम केले नाही. त्यामुळे त्यांच्या पायात या निवडणुकीत जनता पत्रा ठोकल्याशिवाय राहणार नाही,” असे ते म्हणाले. सदाभाऊ खोत यांच्या या फटकेबाजीमुळे सांगलीच्या राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरू झाली आहे.
हे पण वाचा : Union Budget 2026 : ‘उत्पादनाला बळ ते शेअर बाजाराला झटका..’; अर्थसंकल्पातील १० महत्त्वाचे मुद्दे !






