राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारी अध्यक्षांची घोषणा शरद पवार यांनी यावेळी केली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या गळ्यात कार्यकारी अध्यक्षपदाची माळ शरद पवारांनी टाकली. या निर्णयानंतर अजित पवार हे नाराज असल्याचे राजकीय नेत्यांकडून विविध तर्क वितर्क लावले जात होते.
अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अजित पवार यांची नियुक्ती करण्याची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार मागणी केली आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाल्यास पक्षाला बळ मिळेल, असं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणताना दिसत आहेत.
यातच भाजपने नवाच दावा केला आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राष्ट्रवादी सोडणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. जयंत पाटील राष्ट्रवादी का सोडतील? याची दहा कारणेही भाजपने दिली आहेत. जयंत पाटील राष्ट्रवादी सोडण्याची प्रमुख १० कारणे असं ट्विट करत भाजप पक्षाने व्हिडिओ शेअर केला आहे,
भाजपचे ट्विट
जयंत पाटील राष्ट्रवादी सोडण्याची प्रमुख १० कारणे. pic.twitter.com/DqedwvkoBf
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 24, 2023