जयंत चौधरींचा पत्ता कट? डिंपल यादव सपाच्या तिसऱ्या उमेदवार…

लखनौ – येत्या 4 जुलै रोजी उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर गेलेले 11 सदस्यांची मुदत संपणार आहे. यातील तीन जण अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचे आहेत. पक्षाने दोन जणांची उमेदवारी अगोदरच जाहीर केली आहे. तिसरा उमेदवार म्हणून अखिलेश आपले सहकारी राष्ट्रीय लोकदलाचे जयंत चौधरी यांना संधी देतील अशी अपेक्षा होती. मात्र चौधरींच्या नावावर फुली मारली गेली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तिसऱ्या जागेवर अखिलेश यांच्या सौभाग्यवती आणि माजी खासदार डिंपल यादव यांची वर्णी लागणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. कपिल सिब्बल यांनी कॉंग्रेसची साथ सोडत अपक्ष म्हणून राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना सपाने पाठिंबा जाहीर केला आहे. ती दुसऱ्य जागेसाठी जावेद अली यांना पक्षाने तिकीट दिले आहे.
जयंत चौधरी आणि अखिलेश यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक सोबत लढवली होती व त्यांनी भाजपला जोरदार लढत दिली होती. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले चौधरी यांनी सपाच्या तिकिटावर राज्यसभेवर जावे, अशी अखिलेश यांची इच्छा होती. मात्र चौधरी यांना सपाच्या झेंड्याखाली राज्यसभेत जाणे मान्य नसल्याने त्यांनी आपल्याच पक्षाच्या तिकिटावर लढण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
सिब्बल यांच्याप्रमाणे आपल्यालाही अखिलेश पाठिंबा देतील अशी त्यांची अटकळ होती. मात्र अखिलेश यांनी त्यांच्या पत्नीलाच राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येते.





