#Brisbane2032 | आयसीसी अध्यक्ष जय शाहांनी घेतली आयओसीच्या प्रमुखांची भेट, ‘या’ महत्वाच्या विषयावर झाली चर्चा….

ब्रिस्बेन – या महिन्याच्या सुरुवातीला आयसीसीचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणारे जय शाह यांनी गुरुवारी २०३२ ब्रिस्बेन ऑलिम्पिक आयोजन समितीच्या (IOC : International Olympic Committee) उच्च अधिकाऱ्यांची भेट घेतली. यादरम्यान, २०३२ च्या ब्रिस्बेन उन्हाळी ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा संभाव्य समावेश करण्याबाबतही दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली. तब्बल १२८ वर्षांनंतर क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये परतणार आहे. २०२८ च्या लॉस एंजेलिस गेम्समध्ये क्रिकेटच्या टी-२० चा समावेश करण्यात आला आहे. तथापि, ब्रिस्बेनमध्ये २०३२ च्या आवृत्तीसाठी क्रिकेटचा समावेश अद्याप निश्चित झालेला नाही.
या संदर्भात जय शहा यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट द्वारे ऑलिम्पिक चळवळीत क्रिकेटच्या सहभागासाठी खूप रोमांचक काळ असल्याचे पोस्ट केले आहे. ब्रिस्बेन 2032 ऑलिम्पिक आयोजन समितीसोबत ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया येथे बैठक. या बैठकीला ब्रिस्बेन 2032 आयोजन समितीच्या प्रमुख सिंडी हूक आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकले उपस्थित होते.
Very exciting time ahead for Cricket’s involvement in the Olympics movement – a meeting with the @Brisbane_2032 organizing committee in Brisbane, Australia today.@ICC | @Olympics | @CricketAus | @BCCI | #brisbane2032 pic.twitter.com/JVyMbkCYrz
— Jay Shah (@JayShah) December 12, 2024
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गाबा येथे शनिवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात जय शाहही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत तोडगा काढणे हे शाह यांच्यासमोर प्राथमिक आव्हान असणार आहे. सर्व भागधारकांनी हायब्रीड मॉडेलवर सहमती दर्शविली आहे, परंतु अद्याप पीसीबीद्वारे कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, ज्यामुळे स्पर्धेच्या भवितव्यासंदर्भात अजूनही साशंकता आहे.
लॉस एंजेलिसमध्ये क्रिकेटचा समावेश
128 वर्षांनंतर क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केला जाईल. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारिणीने लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यास मान्यता दिली. यापूर्वी १९०० च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळले गेले होते, जिथे इंग्लंड आणि फ्रान्स सुवर्णपदकासाठी आमनेसामने आले होते. मात्र, क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते आणि गेल्या वर्षी त्यात यश आले.
भारतीय उपखंडातील क्रिकेट
वास्तविक, क्रिकेटची लोकप्रियता लक्षात घेऊन आयओसी भारतीय उपखंडातील बाजारपेठेवर लक्ष्य केंद्रित करण्याचा प्रयत्न असणार आहे. यासाठी पुरुष आणि महिला टी-20 क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात येणार आहे. काही माध्यमांच्या अहवालानुसार क्रिकेटच्या समावेशामुळे, २०२४ मध्ये पॅरिस ऑलिम्पिकचे प्रसारण अधिकार 158.6 कोटी रुपयांच्या तुलनेत 2028 मध्ये 1525 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतात.





