राजाळे येथील जवान वैभव भोईटे यांचे लडाखमध्ये अपघाती निधन

सातारा – लडाखमध्ये लष्कराच्या वाहनास झालेल्या अपघातात राजाळे, ता. फलटण येथील जवान वैभव संपतराव भोईटे यांचे निधन झाले. या दुर्घटनेमुळे राजाळे परिसरावर शोककळा पसरली आहे. वैभव भोईटे यांचे पार्थिव उद्या, दि. 21 रोजी दुपारी राजाळे येथे येईल. तेथे भोईटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
दक्षिण लडाखमधील नियमा जिल्ह्यातील कियारी गावाजवळ काल (दि. 19) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भारतीय लष्कराचा ट्रक दरीत कोसळला. या अपघातात नऊ जवानांचा मृत्यू झाला. केरी गावापासून सात किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली. हे जवान गॅरीसवरून लेहजवळच्या केरी शहराकडे निघाले होते.
जवान वैभव भोईटे यांच्या पश्चात पत्नी प्रणाली, मुलगी हिंदवी, आई बीबीताई, वडील संपतराव, दोन विवाहित बहिणी, चुलते मोहन भोईटे, विलास भोईटे असा परिवार आहे. प्रणाली या पोलीस दलात कार्यरत आहेत. जवान वैभव भोईटे यांच्या निधनाची बातमी समजताच राजाळे गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. या घटनेबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.





