Son of Sardaar 2 Review: “13 वर्षांनी जस्सीची धमाकेदार एंट्री”!

Son of Sardaar 2: अजय देवगनचा बहुचर्चित चित्रपट ‘सन ऑफ सरदार 2’ अखेर 13 वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. 2012 मध्ये आलेल्या पहिल्या भागात जसविंदर रंधावा उर्फ जस्सीच्या विनोदी आणि अॅक्शनने प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. आता जस्सी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतलाय. पण या नव्या भागातही तोच जादू टिकवून ठेवू शकेल का, असा प्रश्न प्रेक्षकांना सतावत होता.
या चित्रपटात जुन्या दुश्मनीला सामोरा जाताना जस्सी एका कौटुंबिक नात्याचा आदर राखण्याचा प्रयत्न करतो. चित्रपटात कॉमेडी, अॅक्शन, भावना आणि थोडंसं राजकारण यांचा एकत्रित मसाला आहे. अजय देवगनने नेहमीप्रमाणे दमदार अभिनय करत प्रेक्षकांना खूश केलं आहे. त्याची संवादफेक आणि अॅक्शन सिक्वेन्सेस पाहताना त्याचे चाहते खूश झाले आहेत. मृणाल ठाकूर या भागात नव्याने झळकते आणि तीचा अभिनय व लूक दोन्ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. सहाय्यक कलाकारांची साथ चांगली असली तरी काही विनोद जबरदस्तीचे आणि ओढूनताणून टाकल्यासारखे वाटतात.
सोशल मीडियावर चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी याला ‘देसी कॉमेडीचा धमाका’ म्हणत 4 स्टार्स दिले आहेत तर काहींनी ‘तीच जुनी कथा, तीच फॉर्म्युला ’ म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने लिहिलं, “अजय देवगनचा मास एंटरटेनर आहे ! देसी मसाला आणि पारंपरिक विनोदाने भरलेला मनोरंजन आहे.” दुसऱ्या प्रेक्षकाने मात्र टीका करत म्हटलं, “नवीन काहीच नाही. बऱ्याच प्रसंगांत कंटाळा आला.” तर तिसऱ्या एका प्रतिक्रियेत असं नमूद करण्यात आलं की, “फार बोरिंग नाही, पण काही सीन खूपच लांबवले आहेत. अजय देवगनच्या फॅन्ससाठी मात्र ही मेजवानी आहे.”
चित्रपटातील गाणी लक्षात राहण्यासारखी नाहीत, पण एक-दोन ट्रॅक चांगले जमले आहेत. पार्श्वसंगीत योग्य आहे आणि अॅक्शन सीन जुन्या काळाची आठवण करून देतात. सिनेमॅटोग्राफी रंगीत आणि आकर्षक आहे, त्यामुळे दृश्यरचनेत दर्जा आहे. एकूणच, जर तुम्ही अजय देवगनचे कट्टर चाहते असाल आणि जुन्या शैलीचा मसाला एंटरटेनमेंट आवडत असेल, तर ‘सन ऑफ सरदार 2’ तुमच्यासाठी एक वेळ पाहण्याजोगा चित्रपट आहे. मात्र, काहीतरी वेगळं आणि फ्रेश पाहण्याच्या अपेक्षेने थिएटरमध्ये गेलात, तर तुम्हाला निराशाही पदरी पडू शकते.





