Jasprit Bumrah : भारताच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूवर संतापला बुमराह! चुकीची माहिती पसरवल्याचा केला आरोप

Jasprit Bumrah on Mohammad Kaif : भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आशिया कप 2025 च्या मध्यावर माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने केलेल्या सोशल मीडिया पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. कैफने बुमराहच्या गोलंदाजी रणनीती आणि वर्कलोड व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले होते, ज्याला बुमराहने थेट उत्तर देत कैफचा दावा ‘चुकीचा’ असल्याचे म्हटले आहे. हा वाद आशिया कपच्या अंतिम सामन्यापूर्वी चर्चेत आला आहे, जिथे भारताला पाकिस्तान किंवा बांगलादेश यांच्याशी सामना करायचा आहे.
कैफच्या टीकेवर बुमराहचा संताप –
आशिया कप 2025 मध्ये भारतीय संघ एका नव्या रणनीतीसह खेळत आहे. डेथ ओव्हर्समधील स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा बुमराह यंदा आपल्या 4 ओव्हर्सपैकी 3 ओव्हर्स पॉवरप्लेमध्ये टाकत आहेत. यावरून मोहम्मद कैफने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Inaccurate before inaccurate again 👍🏾 https://t.co/knkjXOGOKb
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) September 25, 2025
कैफने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले, “रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बुमराह सामान्यतः 1, 13, 17 आणि 19 वे ओव्हर टाकायचा. पण सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आशिया कपमध्ये त्याने सुरुवातीला तीन ओव्हर्स टाकल्या आहेत. दुखापती टाळण्यासाठी बुमराह सध्या शरीर ताजे ठेवून गोलंदाजी करत आहेत. उर्वरित 14 ओव्हर्समध्ये बुमराहची एकच ओव्हर फलंदाजांसाठी मोठा दिलासा आहे. विश्वचषकात मजबूत संघांविरुद्ध यामुळे भारताला नुकसान होऊ शकते.” यावर बुमराहने तात्काळ प्रत्युत्तर देत ‘एक्स’वर लिहिले, “पहिल्यांदाही चुकीचे आणि आता पण चुकीचे,” असे म्हणत कैफचा दावा पूर्णपणे खोडून काढला.
आशिया कप 2025 मधील बुमराहचे प्रदर्शन –
आशिया कप 2025 मध्ये बुमराहने आतापर्यंत 4 सामने खेळले असून, त्यात त्याने 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 7.33 असा आहे. गट फेरीतील शेवटच्या सामन्यात त्याला विश्रांतीही देण्यात आली होती. याशिवाय, बुमराहला वेस्ट इंडिजविरुद्ध 2 ऑक्टोबरपासून अहमदाबाद येथे सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. यावरून बुमराह सध्या पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट होते.





