Jasprit Bumrah Health Update: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी आज भारतीय संघाची घोषणा होणार आहे. मात्र, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शेवटच्या कसोटी सामन्यात बुमराहला पाठीच्या दुखापतीने ग्रासले होते. यामुळे त्याला कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी देखील करण्यात आली नव्हती.
आता चॅम्पियन्स ट्रॉफी सारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत बुमराह खेळणार की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. रिपोर्टनुसार, बुमराहची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या भारतीय संघात निवड केली जाऊ शकते. मात्र, दुखापतीमुळे त्याला साखळी सामने खेळता येणार नाही.
सध्या बुमराहला पाठदुखीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्याला बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे, ज्याद्वारे त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवले जाईल. बुमराह मार्चच्या पहिल्या आठवड्यात दुखापतीतून बरा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एनसीएकडून तीन आठवडे त्याच्यावर लक्ष ठेवले जाईल व त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाऊ शकतो.
निवडकर्त्यांकडून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बुमराहची अंतिम 15 खेळाडूमध्ये निवड करावी की राखीव खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश करावा, याचा विचार केला जात आहे. सुरुवातीला बीसीसीआयकडून प्राथमिक संघाची यादी आयसीसीकडे पाठवली जाऊ शकते. बीसीसीआयकडे 12 फेब्रुवारीपर्यंत या यादीमध्ये बदल करण्याची संधी असेल.
दरम्यान, 19 फेब्रुवारीला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर 20 फेब्रुवारीला भारतीय संघाचे सामने सुरू होतील. 20 फेब्रुवारीला भारतचा संघ बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरले. 2 मार्चला भारताचा न्युझीलंडविरुद्ध शेवटचा साखळी फेरीतील सामना आहे. बुमराहला दुखापतीमुळे हे साखळी फेरीतील सामने न खेळण्याची शक्यता आहे.