IND vs AUS : बुमराह सर्वच प्रकारातील अव्वल गोलंदाज..! ऑस्ट्रेलियन दिग्गजाने उधळली स्तुतिसुमने

Ricky Ponting on Jasprit Bumrah : भारताचा जसप्रीत बुमराहने सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. वेगवान गोलंदाज असल्याने अनेकदा दुखापतींचा सामना करावा लागतो. बुमराहने देखील अनेकदा दुखापतींचा सामना केला आहे. मात्र दुखापतीतून सावरल्यानंतर तो गेल्या पाच-सहा वर्षात सर्वोत्तम गोलंदाज आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने व्यक्त केले.
वेगवान गोलंदाजांना दुखापतीच्या समस्याचा सामना करावा लागतो. दोन वर्षांपूर्वी देखील भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला देखील अशाच दुखापतींच्या समस्यांना सामोरे जावे लागले होते. दुखापतींनी ग्रासलेल्या बुमराह परत येईल का अशी भीती वाटत होती, मात्र बुमराहने आपल्या दुखापतींवर मात करताना जोरदार पुनरागमन केले असे पाँटिंग म्हणाला.
कोणत्याही खेळाडूंविषयी माहिती हवी असल्यास त्याच्यासोबत खेळणाऱ्या इतर खेळाडूंकडे विचारणा करावी. बुमराह हा गोलंदाज असल्याने, या संदर्भात मी अनेक फलंदाजाशी बोललो तेव्हा, अनेकांनी बुमराह हे एक भयानक स्वप्न असल्याचे सांगितले. तो कोणता चेंडू टाकणार याचा कोणताच अंदाज येत नसल्याचे अनेकांनी सांगितले. एक चेंडू स्विंग करणार, दुसरा चेंडू सीम करणार, तिसरा इनस्विंग अशा प्रकारे गोलंदाजी केल्याने फलंदाज त्याच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळेच बुमराहने विश्वकरंडक स्पर्धेत १५ पेक्षा अधिक बळी घेताना भारताच्या विजेतेपदात मोलाची भूमिका बजावली असल्याचे पाँटिंगने सांगितले.
बुमराहचा वेग अजूनही तसाच…
विश्वकरंडक स्पर्धेत बुमराहचा वेग अजूनही पाहिल्यासारखाच आहे. त्याच्याकडे कौशल्य आहे. जेव्हा तुमच्याकडे कौशल्य असते आणि त्याला तुम्ही सातत्याची जोड देता, तेव्हाच तुम्ही उत्कृष्ट खेळाडू बनता. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा, इंग्लंडचा जेम्स अँडरसन ही त्याचीच उदाहरणे आहेत. बुमराह देखील त्याच पठडीतला असल्याचे पाँटिंगने सांगितले.





