ICC ODI Ranking | बुमराह सुसाट; गोलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा एकदा सिद्ध केले वर्चस्व

दुबई – इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात सहा गडी बाद करत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आयसीसीच्या एकदिवसीय सामन्यांतील गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे.
बुमराहने 718 रेटिंग गुणांसह क्रमवारीत पहिले स्थान मिळवताना आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. बुमराहने न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टला मागे टाकले आहे. बोल्ट आता दुसऱ्या स्थानावर आहे.
बुमराह एकूण 730 दिवस एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिला होता. अशी कामगिरी आजवर एकाही भारतीय गोलंदाजाला जमलेली नाही. तो टी-20 क्रमवारीतही अव्वल स्थानी होता. कसोटी क्रमवारीत तो सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.
यापूर्वी अनिल कुंबळे, रवींद्र जडेजा हे देखील एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिले होते. एकदिवसीय क्रमवारीत अव्वल 10 गोलंदाजांमध्ये बुमराह व्यतिरिक्त एकही भारतीय गोलंदाजाला स्थान मिळवता आलेले नाही. लेगस्पिन गोलंदाज यजुवेंद्र चहलचा टॉप-20 मध्ये अखेरच्या क्रमांकावर आहे तर, महंमद शमी 23 व्या आणि भुवनेश्वर कुमार 24 व्या स्थानावर आहे.





