जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांचीही चौकशी व्हावी; अंबादास दानवेंची मागणी

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारवर जहरी टीका केली. इतकेच काय तर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील गंभीर आरोप केले होते. त्यादरम्यान जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेत सागर बंगल्यावर कूच केली होती. त्यानंतर आज मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे तीव्र पडसाद विधानसभा तसेच विधानपरिषदेतही उमटले आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी त्यांची मागणी मान्य करत चौकशीचे आदेश दिले आहेत.
काय म्हणाले अंबादास दानवे ?
यावर आज विधानसभेत अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपाची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केले नाहीत. त्यांनी केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आमची याप्रकरणी देखील चौकशी व्हावी, अशी मागणी आहे. कारण आजही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बोलण्यावर मनोज जरांगे यांचा विश्वास असल्याचे दिसते. पण जरांगेचा फडणवीस यांच्यावर विश्वास नाही,” असे दानवे म्हणाले.
या सोबत दानवे यांनी जरांगे यांचे सहकारी ते कोणाला कोणाला भेटले ते पाहा त्यांचे कॉल चेक करा, याचीही देखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आदर करावा लागेल. मागणीचा विषय वेगळा आहे. मनोज जरांगे यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही यावेळी अंबादास दानवे म्हणाले.
जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, SIT चौकशीच्या आदेशानंतर जरांगे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. “देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार आहेत. मी कुठेच चुकीचं नाही आणि कुठेच गुंतू शकत नाही. मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले असून, फोन कॉलवर काय काय बोललेत मी पण उघड करतो,”असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून सगेसोयरे अध्यादेशावर कायदा करा, अशी मागणी केली होती. यावर ते अद्यापही ठाम आहेत.





