जरांगेंच्या मागण्या मान्य, गुणरत्न सदावर्तेंचा आक्षेप; सरकारच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याची केली घोषणा

Gunratan Sadavarte | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने मोठा विजय मिळवला आहे. आझाद मैदानातील आंदोलनाची सांगता झाली असून, सरकारने जरांगे यांच्या प्रमुख मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य केल्या आहेत. हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याच्या मागणीला मान्यता मिळाल्याने मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मात्र, ‘मराठा आणि कुणबी एकच’ ही मागणी आणि सरसकट OBC आरक्षणाचा मुद्दा अद्याप कायम आहे. सरकारने यावर ठोस भूमिका घेतलेली नसली तरी दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे देखील मागे घेतले जातील, असे आश्वासन सरकारने दिले आहे. मात्र अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेत कोर्टात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘हे गुन्हे सरकार मागे घेऊ शकत नाही’
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यायचे असतील तर इतर सर्वच आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, असे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले. याबाबत गुणरत्न सदावर्ते म्हणाले, आंतरवाली सराटीमध्ये पोलिसांना मारहाण झाली. अशा प्रकारचे गुन्हे मागे तर घेऊन पाहू द्या. पोलिसाचा मुलगा म्हणून मी सांगतो की पोलिसांना मारहाण केलेले गुन्हे मागे घेतले जाऊ शकत नाहीत. हे गुन्हे सरकार मागे घेऊ शकत नाही. असे गुन्हे मागे घ्यायला न्यायालयाची परवानगी लागते.
जरांगे आणि मराठा लीडरशिपमुळे मारहाण केलेले गुन्हा मागे घेतले गेले तर मी न्यायालयात जाणार. तसेच ज्यांच्या दबावामुळे हे गुन्हे मागे घेतले जातील त्या सगळ्या मंत्र्यांनाही मी प्रतिवादी करून न्यायालयामध्ये उभे करणार आहे, असा थेट इशाराच सदावर्ते यांनी दिला.
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या. मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याचे त्यांनी जरांगेंना सांगितले. यासंदर्भातला मसूदा देखील त्यांनी दिला.
हेही वाचा :
मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट





