जनशताब्दी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक; तीन हत्तींचा मृत्यू

झारग्राम – पश्चिम बंगालच्या झारग्राम जिल्ह्यात शनिवारी पहाटे जनशताब्दी एक्सप्रेसची धडक बसून मादी हत्ती, तिचं पिलू आणि एक प्रौढ हत्ती यांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना बांसटला रेल्वे स्थानकाजवळ रात्री १.४५ च्या सुमारास घडली. हत्तींचा कळप ट्रॅक ओलांडत असताना ही धडक झाली.
राज्य वन विभागाच्या मदतीने ‘हुला पार्टी’ या स्थानिक तरुणांच्या पथकाद्वारे हत्तींचा कळप मानववस्तीबाहेर काढण्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला.
राज्याच्या वनमंत्री बिरबाहा हांसदा यांनी सांगितले की, रात्री ११ वाजता रेल्वेला हत्तींच्या हालचालीबाबत माहिती देण्यात आली होती. तरीही दुर्घटना घडल्याचे दुर्दैव आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
उत्तर बंगालप्रमाणे दक्षिण बंगालमध्येही एलिफंट कॉरिडॉरसाठी वेगमर्यादा लागू करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मृत हत्ती क्रेनच्या सहाय्याने ट्रॅकवरून हटवण्यात आले. NGO HEAL ने या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत शाश्वत आणि सर्वसमावेशक संघर्ष व्यवस्थापन धोरणाची गरज असल्याचे म्हटले आहे.





