मध्य प्रदेशातील बांधवगडमध्ये दोन दिवसांत 7 हत्तींचा मृत्यू

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील उमरियाच्या बांधवगड व्याघ्र प्रकल्पात बुधवारी सकाळपर्यंत आणखी तीन हत्तींचा मृत्यू झाला. आतापर्यंत 7 हत्तींचा मृत्यू झाला आहे. दिल्लीहून एनटीसीए (नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटी) टीम तपासणीसाठी बांधवगडला पोहोचली आहे.
मंगळवारी जंगलात चार हत्ती मृतावस्थेत आढळले. तीन हत्तींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तीन हत्ती जंगलात असताना दोन अधिकाऱ्यांचे पथक त्यांच्यावर नजर ठेवून आहे. डॉक्टरांनी प्राथमिकरीत्या विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. आठ डॉक्टरांचे पथक हत्तींचे शवविच्छेदन करत आहे. यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठी 300 पोती मीठ मागवण्यात आले आहे. दोन जेसीबीच्या साहाय्याने खड्डे बनवले जात आहेत.
बांधवगड, संजय व्याघ्र प्रकल्पासह कटनी, उमरिया आणि स्कूल ऑफ वाइल्डलाइफ फॉरेन्सिक अँड हेल्थ, जबलपूर येथील पशुवैद्यकीय डॉक्टर हत्तींच्या उपचारात गुंतले आहेत. भोपाळहून एसटीएफची टीमही दाखल झाली आहे. पाच किलोमीटर परिसरात तपास सुरू आहे. बांधवगड व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक पीके वर्मा यांनी सांगितले की, मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जंगलात १३ हत्तींचा कळप फिरत असल्याची माहिती मिळाली. खिटौली आणि पटौर भागातील सालखानिया येथे आठ हत्तींची प्रकृती खालावली. 100 ते 200 मीटर परिसरात सर्वजण बेशुद्ध पडले. यानंतर बांधवगड व्याघ्र प्रकल्प, जबलपूर, उमरिया आणि कटनी येथून आठहून अधिक पशुवैद्यकीय डॉक्टरांना पाचारण करण्यात आले.
पीके वर्मा म्हणाले, राखीव भागात 60 हून अधिक जंगली हत्ती आहेत, जे वेगवेगळ्या कळपांमध्ये फिरतात. त्यांची काळजी घेण्यासाठी दररोज जंगलात गस्त घालण्यात येते. हत्तींनी काही विषारी किंवा मादक पदार्थ प्राशन केल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोडो-कुटकीही याच भागात आढळतात. अशी शक्यता आहे की हत्तींनी जास्त किंवा कमी शिजलेली कोडो-कुटकी खाल्ली असावी, ज्यामुळे निर्जलीकरण देखील होऊ शकते.





