जनता जनार्दन हाच माझा पक्ष – मोहिते पाटील

अकलूज (प्रतिनिधी) –मी नेहमी जनते बरोबर असतो, त्यामुळे जनता जनार्धन हाच माझा पक्ष असल्याची प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिली.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी मेळाव्याचे 12 जानेवारीला आयोजन करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी सहकार महर्षी कारखान्याच्या उदय सभागृहामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.
या नियोजन बैठकीस माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, शिवामृत दूध संघाचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील, जिल्हा परिषद सदस्या स्वरूपाराणी मोहिते पाटील, सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांसह तालुक्यातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.
विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीच सर्व घडामोडी होत असतात. ते भाजप किंवा राष्ट्रवादी अशा कुठल्याही पक्षात नाहीत, तर ते जनतेबरोबर राहणारे नेते आहेत, असे प्रतिपादन यावेळी धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले. कार्यक्रमात जिल्हा परिषदेमध्ये अचूक नियोजन करून जिल्हा परिषद ताब्यात घेतल्याबद्दल माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते-पाटील यांचा आणि जिल्हा परिषद सदस्यांचा सन्मान माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.





