Jammu-Kashmir : “जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा”; कॉंग्रेसची केंद्र सरकारकडे मागणी

Jammu and Kashmir – जम्मू काश्मीरचा केंद्रशासित राज्याचा दर्जा काढून राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करावा अशी मागणी या राज्यातील कॉंग्रेस पक्षाकडून केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीर काँग्रेसने गेल्या महिन्यात ऑपरेशन सिंदूर दरम्यान सीमेवर पाकिस्तानी गोळीबारात बळी पडलेल्यांसाठी विशेष पॅकेजची मागणीही केली आहे.
प्रकरणात जम्मू आणि काश्मीरच्या लोकांना सुरक्षा देण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे अशी टीका करतानाच प्रदेश काँग्रेस समितीचे (पीसीसी) कार्यकारी अध्यक्ष रमण भल्ला यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरचा राज्याचा दर्जा बहाल करण्याबाबतची संदिग्धता संपवण्याची गरज आहे.
केंद्र सरकारमधील मंत्री योग्य वेळी राज्याचा दर्जा पुन्हा दिला जाण्याबद्दल बोलत आहेत, परंतु या मागणीच्या पूर्ततेसाठी लोकांना किती काळ वाट पाहावी लागेल? भल्ला यांनी लडाख आणि जम्मू आणि काश्मीरमधील हक्क आणि संवैधानिक संरक्षणातील असमानतेचाही उल्लेख केला.
त्यांनी प्रश्न उपस्थित केला की जम्मू आणि काश्मीरमधील रहिवाशांना समान अधिकार आणि लोकशाही तरतुदी का दिल्या जात नाहीत? ते म्हणाले की लडाखकडे दुर्लक्ष का केले जात आहे? रमण भल्ला यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल सांगितले की, त्यासाठी जबाबदार असलेले अजूनही फरार आहेत. बॉम्बस्फोटानंतर सीमावर्ती गावांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारच्या तयारीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.





