Jammu and Kashmir : काश्मीर खोऱ्यात पेट्रोल टंचाई निर्माण झाली असल्याच्या बातम्या आहेत. सोमवारी अनेक पंपावर पेट्रोल नसल्याचे सूचना फलक लावण्यात आले होते. मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद असल्याने माल वाहतूक विस्कळीत झाली असून त्याचा फटका पेट्रोलच्या पुरवठ्याला बसला आहे. श्रीनगरमधील एका पेट्रोल पंपावरील एका दुचाकीस्वाराने सांगितले की, बडगाम ते इथपर्यंतच्या कोणत्याही पेट्रोल पंपावर त्याला पेट्रोल मिळाले नाही. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे आणि सरकारने लवकरात लवकर व्यवस्था करावी. जेणेकरून गरीब माणसाला त्रास सहन करावा लागणार नाही एका पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने सांगितले की, राष्ट्रीय महामार्गाची स्थिती खूपच खराब झाली आहे. त्यामुळे वाहने येऊ शकत नाहीत. पेट्रोलचा साठा संपला आहे. डिझेल आहे. पेट्रोलही लवकरच येईल. विभागीय आयुक्त अंशुल गर्ग म्हणाले की, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा आहे आणि पेट्रोलबाबतची स्थितीही २ दिवसांत सुधारेल. गेल्या काही दिवसांत जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे अनेक भागात भूस्खलन झाले. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग ९ दिवस बंद राहिल्यानंतर १० सप्टेंबर रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पावसामुळे महामार्गाचे बरेच नुकसान झाले आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या मते, जम्मू आणि काश्मीरमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे सुमारे १२,००० किलोमीटर रस्ते खराब झाले आहेत. मुसळधार पावसामुळे २६ ऑगस्टपासून वैष्णोदेवी यात्राही स्थगित करण्यात आली आहे