जम्मू-काश्मीर रणसंग्राम अजेंड्यावर; निवडणूक आयोगाची उद्या गृह सचिवांसमवेत बैठक

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाच्या अजेंड्यावर सध्या जम्मू-काश्मीरमधील विधानसभेचा रणसंग्राम आहे. ती निवडणूक विचारात घेऊन उद्या (बुधवार) आयोगाची केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांच्या समवेत बैठक होणार आहे. त्यामध्ये तेथील सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला जाईल.
जम्मू-काश्मीरमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत विधानसभा निवडणूक घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने याआधीच दिला आहे. ती मुदत जवळ येऊन ठेपल्याने निवडणूक आयोग सक्रिय झाला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह संपूर्ण आयोगाने नुकताच जम्मू-काश्मीरचा दौरा केला. त्या दौऱ्यात आयोगाने राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सुरक्षा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या.
निवडणूक तयारीची चाचपणी करण्याच्या उद्देशातून तो दौरा झाला. आता आयोग भल्ला यांच्याशी चर्चा करणार आहे. संबंधित बैठकीत सुरक्षा स्थितीबाबत तपशीलवार आढावा घेतला जाईल. त्यानंतर निवडणूक आयोग जम्मू-काश्मीरमधील रणसंग्रामाचा कार्यक्रम जाहीर करण्यास सज्ज होईल. तेथील निवडणुकीची घोषणा चालू महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे.





