पुसेगाव, {प्रकाश राजेघाटगे} – सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांचा झालेला पराभव शरद पवार यांना जिव्हारी लागला आहे. म्हणून कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांचे नातू व जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मैदानात उतरवण्याचा त्यांचा मानस दिसत आहे. जिल्ह्यात आज भाजप दिसत असला तरी, जिल्हा कधीच भाजपचा नव्हता. १९९७ च्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले व त्यानंतर खटावला १९९९ मध्ये दिलीप येळगावकर यांनी भाजपाचे कमळ जिल्ह्यात फुलवले होते. जिल्ह्यात सद्या भाजप जोरावर आहे. या राजकीय वातारणात शरद पवार यांचा अंदाज कुणाला लागू शकत नाही. कारण आ. शशिकांत शिंदे यांच्या पराभवाने श्री. पवार अत्यंत व्यथित आहेत. म्हणून तर पवार आपला हुकमी एक्का कोरेगावातील मैदानावर उतरवणार आहेत. कारण सातारा जिल्ह्याच पवार यांचा उत्तम पाया आहे. यावरून श्री. पवार यांनी पुढील गणिते आखली आहेत. कोरेगाव मतदारसंघात आ. महेश शिंदे यांचा मोठा बोलबाला आहे. करोना काळात त्यांनी लोकांची खूपच सेवा केली असे सर्वसामान्य नागरिक खाजगीत सांगतात. परंतु, रयतवरून केलेल्या टीकेमुळे श्री. पवार यांना महेश शिंदे खटकत आहेत, असेही लोक खाजगीत सांगतात. म्हणून तर रोहित पवार यांना जामखेडवरून कोरेगावात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न दिसत आहेत. परंतु, कोरेगावची जनता काय करते ते पाहावेच लागेल.