Jamkhed News : रोहित पवारांनी पूर्ण केले आश्वासन; भोगलवाडीतील विठ्ठल मंदिराला मिळाला भव्य सभामंडप

जामखेड : तालुक्यातील कुसडगाव येथील भोगलवाडी गावातील विठ्ठल मंदिर परिसरात गेल्या वर्षी श्रावण महिन्यातील अखंड हरिनाम सप्ताहादरम्यान पावसामुळे भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. सभामंडप नसल्याने कीर्तन आणि प्रसाद वितरणात अडचणी आल्या होत्या. यावेळी गावातील काही भाजपा नेत्यांनी पुढील वर्षी सभामंडप उभारण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते पूर्ण झाले नाही. यामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती.
या समस्येची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांचे खंदे समर्थक आणि माजी सरपंच बापूसाहेब कार्ले यांनी गावातील कार्यकर्त्यांसह पुढाकार घेतला. त्यांनी आमदार रोहित पवार यांच्याकडे सभामंडप उभारण्याची मागणी केली. रोहित पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि अवघ्या नऊ महिन्यांत भव्य आणि आकर्षक सभामंडप उभारण्यात आला.
या प्रकल्पात गावकऱ्यांनीही सक्रिय सहभाग घेतला. मंदिराच्या शिखरासाठी गावकऱ्यांनी आर्थिक योगदान दिले, तर गावातील महिलांनी वर्गणी गोळा करून मंदिराच्या कळसाची उभारणी केली. या एकजुटीचे आणि सामुदायिक प्रयत्नांचे फलित म्हणून मंदिर परिसरात भव्य सभामंडप उभे राहिले. या सभामंडपाचे लोकार्पण रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
लोकार्पण सोहळ्यावेळी गावातील लाडक्या बहिणींचा त्यांच्या योगदानासाठी विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बापूसाहेब कार्ले, गावकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि इतर मान्यवर उपस्थित होते. गावकरी, महिला आणि पुढारी यांच्या एकजुटीमुळे गावाचा कायापालट कसा होऊ शकतो, याचे भोगलवाडीतील हे काम उत्तम उदाहरण ठरले आहे.
गावकऱ्यांनी आमदार रोहित पवार यांचे आभार मानले, कारण त्यांनी दिलेला शब्द पाळून गावातील भाविकांचे वर्षानुवर्षांचे स्वप्न पूर्ण केले. याउलट, मागील वर्षी आश्वासन देऊनही शब्द न पाळणाऱ्या भाजपा नेत्यांबद्दल गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. या घटनेने गावकऱ्यांचा रोहित पवार यांच्यावरील विश्वास आणखी दृढ झाला आहे.





