Jamkhed News : “जामखेडच्या रेशन घोटाळ्याचा पर्दाफाश: स्थानिक प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह!”

जामखेड : जामखेड येथून सांगलीला रेशनच्या तांदळाच्या 400 गोण्यांचा काळ्याबाजारात विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या ट्रकसह 30 लाख रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे. या प्रकरणी एका व्यापाऱ्यासह दोन जणांवर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी दैनिक प्रभातमध्ये जामखेडमध्ये स्वस्त धान्याच्या काळ्याबाजाराचे वृत्त प्रसिद्ध झाले होते, तरीही स्थानिक प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
घटनेचा तपशील
26 जून 2025 रोजी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, जामखेड ते करमाळा रस्त्यावर टाटा 2518 ट्रक (क्रमांक MH-17-BD-8102) मधून रेशनचा तांदूळ काळ्याबाजारात विक्रीसाठी सांगलीला नेला जात आहे. या माहितीच्या आधारे पथकाने जामखेड-करमाळा रस्त्यावरील आयटीआयजवळ सापळा रचला. ट्रक अडवून तपासणी केली असता, चालक सुंदर बबन घुमरे (वय 60, रा. लोणी, ता. जामखेड) याने ट्रकमधील 400 गोण्यातील तांदूळ हा शासकीय स्वस्त धान्य वितरण योजनेचा असून, तो योगेश मोहन भंडारी (रा. जामखेड) याच्या दुकानातून सांगलीला विक्रीसाठी नेत असल्याचे कबूल केले.
पंचांसमक्ष 400 गोण्यांचा तांदूळ (किंमत 25 लाख रुपये) आणि ट्रक (किंमत 5 लाख रुपये) असा एकूण 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुंदर घुमरे याला ताब्यात घेऊन जामखेड पोलीस ठाण्यात हजर केले, तर दुसरा आरोपी योगेश भंडारी फरार झाला आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3 आणि 7 अंतर्गत गुन्हा (क्र. 362/2025) नोंदवण्यात आला.
पोलीस कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केली. स्थानिक प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, तहसीलदार आणि तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.





