प्रभात वृत्तसेवा जामखेड – येथील नगरपरिषद निवडणुकीसाठी जोरदार घडामोडींनी वेग घेतला असून, भाजप, राष्ट्रवादीकडून अजूनही नगराध्यक्षा पदाचा चेहरा कोण असणार हे अद्याप उघड झाले नाही. त्यातच आम आदमी पक्षाने नगरपरिषद निवडणुकीत उडी घेतली असून, थेट नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पदाचा उमेदवार जाहीर केला आहे. रहिमुन्निसा कमाल शेख असे उमेदवारी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवार नाव आहेआगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपरिषद निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने जामखेडमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी शहराध्यक्ष अजय भोसले, जिल्हा संघटक बजरंग सरडे, प्रसिद्धीप्रमुख ॲड.बिपिन वारे, संजय सदाफुले, गोकुळ परदेशी, सुंदर परदेशी, दीपक शेळके,अतुल खराडे, ऋषिकेश लांडगे, जुबेर काझी, ॲड. सागर मोरे,ॲड. जैद सय्यद, विकास पवार, अब्दुल शेख, नाजिम पठाण, अरफान शेख, अरबाज सय्यद, सलिम शेख, स्वप्नील वारे, सकलेन पठाण, सुभाष निमोणकर, दादा गर्जे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नगराध्यक्ष पदासाठी अल्पसंख्याक चेहरा तसेच नगरसेवक पदासाठी अठरापगड जातींना बरोबर घेऊन व नवीन चेहर्यांना संधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जामखेड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण महिलेसाठी नगराध्यक्षा पदाची जागा असून, अल्पसंख्याक समाजातील युवा नेते आसिफ कमाल शेख यांच्या मातोश्री रहिमुन्निसा कमाल शेख यांची शिफारस प्रदेश अध्यक्ष अजित फाटके पाटील, दक्षिण जिल्हाध्यक्ष राजु आघाव यांच्या आदेशानुसार व जामखेड तालुका आम आदमी पार्टीच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली.नगरपरिषदेसह सर्व पदांसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू असून, नागरिक आणि उमेदवारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.