जामखेड नगरपरिषदेची ‘अभय योजना’; थकबाकीदारांना 50% शास्ती माफी

जामखेड : जामखेड नगरपरिषद क्षेत्रातील थकबाकीदारांना मालमत्ता करावरील शास्तीच्या ५० टक्के रकमेवर माफी देणारी ‘अभय योजना’ लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने १९ मे २०२५ रोजी नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफ करून वसुलीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘अभय योजना’ जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत, जामखेड नगरपरिषदेने थकबाकीदारांना मालमत्ता करावरील ५० टक्के शास्ती माफीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या प्रस्तावाला मंजुरी देत ३,७४,३९,७८७ रुपये इतक्या शास्ती रकमेच्या माफीला मान्यता दिली आहे.
योजनेच्या अटी व शर्ती:
-३१ मार्च २०२५ पर्यंतच्या थकीत मालमत्ता कराचा भरणा ३१ मार्च २०२६ पर्यंत करणाऱ्या मालमत्ता धारकांनाच या योजनेचा लाभ मिळेल.
-३१ मार्च २०२५ पर्यंतच्या थकबाकीवरील ५० टक्के शास्ती माफ केली जाईल.
-३१ मार्च २०२६ नंतरच्या प्रकरणांचा शास्ती माफीकरिता विचार केला जाणार नाही.
मालमत्ता कराची थकबाकी आणि शास्तीमुळे अनेक मालमत्ता धारकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ अंतर्गत, थकीत रकमेवर दरमहा २ टक्के शास्ती आकारली जाते, ज्यामुळे थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे कर वसुलीवर विपरीत परिणाम होतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शासनाने ही योजना लागू केली आहे.
मुख्याधिकारी अजय साळवे यांनी सांगितले की, जामखेड नगरपरिषद क्षेत्रातील थकबाकीदारांनी या संधीचा लाभ घेऊन विहित नमुन्यात अर्ज भरून थकीत मालमत्ता कर आणि शास्तीचा भरणा तत्काळ करावा. यासाठी नगरपरिषद कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.





