Jamkhed Election : जामखेडमध्ये ‘महिला राज’! जिल्हा परिषद-पंचायत समिती आरक्षण जाहीर, पाहा संपूर्ण यादी

प्रभात वृत्तसेवा
जामखेड – तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट आणि गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली. तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गटांपैकी खर्डा, साकत सर्वसाधारण तर जवळा गट ओबीसी महिला राखीव पडला आहे. तालुक्यातील एकूण ६ पैकी तीन गण महिलांसाठी आणि तीन पुरुषांसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती इच्छुकांनी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे.
जामखेड पंचायत समितीच्या एकूण ६ गणांपैकी तीन जागा महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत महिलांचे मोठे प्रतिनिधित्व दिसून येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये या आरक्षणाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता प्रत्येक पक्ष आणि संभाव्य उमेदवार या नव्या आरक्षणानुसार आपली रणनिती आखतील.
याआधी पंचायत समिती सभापती आरक्षण ओबीसी महिला म्हणून पडले. तालुका पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीची तयारी प्रशासनाच्या पातळीवर पूर्ण वेगाने सुरू झाली आहे. पंचायत समितीच्या सहा गणांचे आरक्षण सोडतीद्वारे काढण्यात आले. जामखेड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जवळा हा गण अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. अरणगाव गण ओबीसी महिला पडला असून, दिघोळ, साकत, खर्डा, शिऊर हे गण सर्वसाधारण म्हणून आरक्षित झाले आहेत.
तालुक्यात एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गणाचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. ३ ठिकाणी महिला आरक्षण पडल्याने अनेकांचे मनसुबे हवेत विरल्याचे चित्र यावेळी पाहण्यास मिळाले. प्रत्येकाला आपल्या पंचायत समिती गणामध्ये आपल्या बाजूने आरक्षण पडेल असेल वाटत असताना अनेकांना हे आरक्षणाने धक्का दिला आहे.





