Jambut News: जांबूतमध्ये रस्ते रुंदीकरणाच्या संथ कारभारावर ग्रामस्थ आक्रमक; अल्टिमेटम देत दिला आंदोलनाचा इशारा
Jambut News:नागरिकांचे आरोग्य धोक्यात

जांबूत – जांबूत (ता.शिरूर) येथे सुरु असलेल्या प्रमुख जिल्हा मार्ग १४ आणि प्रमुख जिल्हा मार्ग ५१ या दोन्हीही रस्त्यांचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र सदर रस्त्याच्या कामाची गती संथ असून गेली सहा महिने काम रखडल्याने जांबूत ग्रामस्थांनी या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
संबंधित रस्त्यांच्या कामामुळे गेली सहा महिने रस्त्याच्या बाजूने असलेली गटरलाईन बंद अवस्थेत असून जुनी गटरलाईन देखील संबंधित रस्ते एजन्सीकडून तोडण्यात आल्याने पसरलेल्या दुर्गंधीमुळे शालेय विद्यार्थ्यांसह गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गावाला पाणीपुरवठा करणारी लाईनचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढील सात दिवसांत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर कामाबाबत तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा जांबूत ग्रामस्थांच्या वतीने सदर ठेकेदार प्रशासनाविरोधात आंदोलन उभे करण्यात येईल, असा इशारा जांबूतच्या उपसरपंच राणी बोऱ्हाडे व ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी पत्राद्वारे दिला आहे.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे अंतर्गत गायमुख – अवसरी – शिक्रापूर या रस्त्याचे कॉंक्रेटीकरणाचे काम सुरु असून सदर कामात अनियमितता दिसून येते परिणामी काम संथ गतीने सुरु असून या रस्त्याच्या कामादरम्यान गावातील मुख्य ठिकाणी गटरलाईनचे काम अर्धवट स्वरुपात असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे गावासाठी पिण्याचे पाण्याच्या पुरवठा करणारी पाईपलाईन देखील काम करणाऱ्या एजन्सीकडून तोडण्यात आली आहे.
दरम्यान, रस्ते प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आणि निष्काळजीपणामुळे गावात ठिकठिकाणी दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अर्धवट स्वरुपात सुरु असलेल्या रस्ता आणि गटारलाईनचे कामामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून गावातील नागरिक, शालेय विद्यार्थी आणि व्यावसायिक यांना या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
याप्रकरणी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आरोग्याशी निगडीत उद्भवणाऱ्या समस्यांना रस्ते प्रशासन आणि ठेकेदार यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
हेही वाचा:
Karan Razdan: “आमिर-जुहीचा बहुचर्चित ‘टाइम मशीन’ चित्रपट का रखडला? करण जोहरच्या ऑफरमुळे लेखक नाराज”





