जांबे गावचा महापालिकेत समावेश व्हावा

हिंजवडी : राजीव गांधी आयटी पार्कलगतच्या जांबे गावाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्याची जोरदार मागणी ग्रामपंचायतसह ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.
जांबे परिसरात वाढत्या नागरीकरणामुळे गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या ग्रामपंचायतीच्या क्षमतेपलीकडे गेल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. पीएमआरडीए प्राधिकरणही या समस्या सोडवण्यात अपयशी ठरल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या भागात संपूर्ण देशातून आलेल्या नागरिकांची संख्या प्रचंड वाढली आहे. अरुंद व खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी, अपघात, कचर्याचा प्रश्न, मलनिस्सारण यंत्रणेचा अभाव, दूषित पाणीपुरवठा, आरोग्य समस्या आणि सार्वजनिक सुविधांचा अभाव अशा समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.
या असुविधांमुळे आयटी पार्कमधील अनेक कंपन्या इतर राज्यांत स्थलांतरित झाल्याने शासनाचा हजारो कोटींचा महसूल बुडाल्याची खंतही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जांबे गावाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश होणे हेच एकमेव उपाय असून, ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच द्रौपदी जगताप व उपसरपंच प्रमिला गायकवाड यांनी हे निवेदन सादर केले आहे.
जांबे गाव महानगरपालिका हद्दीलगत गाव आहे. परंतु बकालपणा वाढत असून वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरविणे ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेर गेले आहे. सुनियोजित, सुरक्षित व सुंदर रहिवासी भाग म्हणून विकसित होण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जांबे गावचा समावेश करावा.
– अंकुश गायकवाड, माजी सरपंच, जांबे
भविष्याचा विचार करून सुनियोजित विकास करायचा असेल तर महापालिकेशिवाय पर्याय नाही, त्यामुळे सरकारने विलंब न लावता आमची गाव महापालिका हद्दीत समाविष्ट करून घेतली पाहिजेत.
– ऋषिकेश गायकवाड, माजी सरपंच, जांबे





