Opium Farming – हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जांबे गावात शेतात अफूची झाडे लावून त्याची जोपासना करणाऱ्या एका ७७ वर्षीय शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. २० फेब्रुवारी) रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास करण्यात आली. संपत बाबुराव दर्शिले (वय ७७, रा. रसिकवाडी, जांबे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी गुंडा विरोधी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक विक्रम जगदाळे यांनी शनिवारी (दि. २१) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संपत दर्शिले यांचे शालीमकर स्पोर्ट्स एरिना शेजारी शेत आहे. शेतात आरोपी संपत दर्शिले याने विनापरवाना अफूची लागवड केली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून १६ किलो ८१० ग्रॅम वजनाची अफूची झाडे जप्त केली आहेत. या जप्त केलेल्या मालाची किंमत सुमारे २५ लाख १७ हजार ५०० रुपये आहे. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत