Jalgaon News : धक्कादायक ! जळगावमध्ये 2 महिलांची निर्घृणपणे हत्या

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सुमठाणे भागात एका विकृत सिरीयल किलरने दीड महिन्यात दोन महिलांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमाचे खोटे नाटक करून महिलांना आपल्या जाळ्यात ओढणा-या या नराधमाचे नाव अनिल गोविंदा संदानशिव आहे. सुदैवाने, त्याच्या तावडीतून एक तिसरी महिला थोडक्यात बचावली आणि तिच्यामुळेच हे भयानक सत्य समोर आले आहे.
शोभाबाई रघुनाथ कोळी, वैजंताबाई भोई अशी खून झालेल्या दोन मयत महिलांची नावे असून शहनाज बी या महिलेच्या खुनाचा प्रयत्न केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, तो महिलांशी गोड बोलायचा, त्यानंतर ओळख निर्माण करून तो त्यांचा विश्वास मिळवायचा. त्यानंतर त्यांच्यासोबत शरीरसंबंध ठेवून त्यांचा खून करून मृतदेह जंगलात फेकून द्यायचा. त्याची हत्या करण्याची स्टाईलदेखील एकच असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जळगावच्या अमळनेर येथील सुमठाणे व जानवे शिवारात दोन महिलांचे खून करून तिस-या महिलेच्या खुनाच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अनिल गोविंद संदानशिव असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तो अमळनेर तालुक्यातील सुमठाणे येथील रहिवासी आहे. महिलांकडे असलेले पैसे तसेच दागिने मिळवण्यासाठी तो महिलांचे खून करायचा अशी माहिती तपासात समोर आली आहे. अटकेतीलआरोपीने दोन्ही खुनांची, तसेच एक खुनाच्या प्रयत्नाच्या घटनेची कबुली दिली आहे.





